पुणे :- राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी ३ एप्रिल रोजी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयाने दिली आहे.
इयत्ता ५ वी व ८ वीची वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता ५ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता ८ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असतील. तसेच इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे.
या परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी. शाळांनी प्रश्नपत्रिका तयार करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध नमुना प्रश्नपत्रिकेचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.
इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत त्यासाठी त्यांच्या शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षाचे आयोजनदेखील शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबधित शासन निर्णयात दिलेले आहेत.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ पासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन (पीएटी) चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ चे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यमापन २ चे आयोजन २ ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.
इयत्ता ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालीक मुल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन २ असेल त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन २ घेण्यात येणार नाही व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन २ शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यावयाच्या आहे.
इयत्ता ५ वी व ८ वी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) ही संकलित मूल्यमापन २ असणार नाही. या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी २, ते ४ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे या चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे.
सर्व शाळांनी सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक (समन्वय) डॉ. कमलादेवी आवटे यांनी केले आहे.