माजी राज्यसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काल नागपुरात येऊन एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने संभाजी महाराजांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली, ती हिंदूंचा धर्मग्रंथ मनुस्मृतीतील सूचनानुसार केली होती. त्याने आपल्या दरबारातील हिंदू पंडितांना याबाबत विचारणा केली आणि त्यांच्याच सूचनेनुसार ही क्रूर हत्या झाल्याचा दावा हुसेनभाईंनी केला. हे मुख्यमंत्री फडणवीस मानायला तयार होतील काय, असा सवाल करीत फडणवीस यांनीही अभ्यास करावा असा प्रेमाचा सल्ला देखील दलवाई यांनी दिला आहे.त्यांचे हे वक्तव्य बहुतेक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केले आहे, तसेच युट्युब वर देखील उपलब्ध आहे. आज विविध स्थानिक वृत्तपत्रांमध्येही याबाबत वृत्त प्रकाशित झाले आहे.
सकृतदर्शनी तरी हुसेन दलवाई यांचा हा दावा अगदी बिनबुडाचा आणि हास्यास्पदच वाटतो. तरीही या संदर्भात काही इतिहास अभ्यासक आणि काही मनुस्मृति अभ्यासकांशी चर्चा केल्यावर मी यासंदर्भात आपली मते आपल्यासमोर मांडणार आहे.
आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ हुसेन दलवाई यांनी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या एका ग्रंथात असा उल्लेख असल्याचा दाखला एका खाजगी वृत्तवाहिनेशी बोलताना दिला आहे. मात्र नंतर थोड्याच वेळात श्रीमंत कोकाटे यांनी त्याच वाहिनीशी बोलताना आपण असा कोणताही दावा कधीही आणि कुठेही केला नसल्याचा खुलासा केला आहे. या संदर्भात मी स्वतः हुसेन दलवाई यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे असल्यास द्यावे अशी विनंती केली. त्यांनी “सध्या मी गडबडीत आहे,तुला नंतर पाठवतो” असे सांगितले. त्याला जवळजवळ २४ तास उलटले तरी अद्याप मला त्यांच्याकडून कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
हा लेख प्रकाशित झाल्यावरही पुरावे मिळाल्यास मी त्यांची बाजू मांडणारा दुसरा लेखही देण्यास तयार आहे.
औरंगजेबाच्या दरबारी खाफीखान नावाचा फारसी विद्वान होता. या खाफिकानानेच औरंगजेबाचे मासरे आलमगीर हे चरित्र लिहिले आहे. या चरित्रात नमूद केल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कवी कलश या दोघांनाही अटक केल्यावर औरंगजेबाच्या समोर उभे करण्यात आले होते. त्यावेळी तिथे दरबारातील मुल्ला मौलवी उपस्थित होते. या मुल्ला मौलवींना औरंगजेबाने प्रश्न केला की या गुन्हेगारांना काय शिक्षा द्यावी? छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांनीही हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मात प्रवेश करण्यास नकार दिला होता. तसेच संभाजी महाराजांनी औरंगजेबाला काही शिव्याही दिल्या होत्या, अशीही नोंद त्यात चरित्रात आहे. तसेच औरंगजेबाने जिंकलेल्या मुलुखावर स्वाऱ्या करून तो मुलुख बळकावणे हा देखील संभाजी महाराजांचा त्यांच्या दृष्टीने एक गुन्हा होता. मौलवींच्या दृष्टीने हा राजद्रोह आणि धर्मद्रोह होता. (मुस्लिम शरीया कायद्यानुसार धर्मद्रोह करणारे काफीर ठरत असतात. तसेही औरंगजेब हा सर्वच हिंदूंना काफीरच ठरवत होता.) त्यामुळे त्यांना मृत्यू दंडाचीच शिक्षा देणे उचित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच शिवीगाळ केल्यामुळे याची जीभ देखील हासडण्यात यावी असेही त्यांनी सुचवले होते. त्यानुसार औरंगजेबाने त्याच रात्री या दोघांचेही डोळे काढण्यात यावे तसेच जीव हासडण्यात यावी आणि पुढले महिनाभर यांना अंधार कोठडी ठेवून महिनाभराने यांना मृत्यू दंड द्यावा अशी शिक्षा फर्मावली होती.
त्यानुसार त्याच रात्री छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे काढून जीभ हासडण्यात आली आणि त्यानंतर अंधार कोठडीत ठेवलेल्या या दोघांचीही २६ दिवसांनी अनन्वित छळ करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याआधी देखील हे २६ दिवस या दोघांनाही अतोनात यातना सहन कराव्या लागल्या होत्या. तसेच मृत्यूच्या वेळीही त्यांचे हाल हाल करून त्यांना मारले होते अशी इतिहासात नोंद आहे. या सर्व नोंदी “मासरे आलमगीर” या चरित्रात असल्याचे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या हाल करून केलेल्या हत्या ही क्रौर्याची परिसीमाच होती हे मात्र हुसेनभाई बिनातक्रार मान्य: करतात, त्याबद्दल समस्त शिवप्रेमींतर्फे त्यांना धन्यवादच द्यायला हवेत.
या संदर्भात मी काही मनुस्मृतीच्या अभ्यासकांशीही संपर्क साधला तेव्हा मनुस्मृति या ग्रंथात शत्रूला इतक्या कठोर शिक्षा द्याव्या अशी कोणतीही तरतूद नाही, असे उत्तर मला मिळाले. मनुस्मृतिनंतर चाणक्य नीति अस्तित्वात आली होती. त्यातही इतक्या कठोर शिक्षा सुचवण्यात आलेल्या नाहीत असे या जाणकारांनी स्पष्ट केले.
औरंगजेबाने या हत्या मनुस्मृतीतील तरतुदीनुसार केल्या होत्या हे क्षणभर खरे मानले, तर याच औरंगजेबाने आपला बाप शहाजहान बादशहा याला दीर्घकाळ तुरुंगात ठेवून त्याची हत्या केली होती. तसेच त्याने आपला सख्खा भाऊ दारा शुकोह आणि मुरादबक्ष या दोघांचीही हाल हाल करून हत्या केली होती. या दोघांना तर नग्न करून दिल्लीच्या रस्त्यांवरून उंटावरून त्यांची धिंड काढली होती, आणि नंतर त्यांची हत्या केली होती. अशी ही माहिती मिळते. दारा शुकोहचा मुलगा म्हणजेच औरंगजेबाचा पुतण्या सुलेमान शुजा याचीही त्याने अशीच क्रूर हत्या केली होती. मग सख्या बापाला, सख्ख्या भावांना आणि सख्ख्या पुतण्याला हाल हाल करून मारण्याची तरतूदही मनुस्मृतित आहे का आणि त्यानुसारच औरंगजेबाने या हत्या केल्या का याचा खुलासही हुसेन दलवाईंनी करायला हवा.भारताची प्राचीन वेदकालीन संस्कृती आहे. इथे जन्मदात्या माय बापाचा आदर करण्याची परंपरा आहे. वडिलांनी सावत्र आईला दिलेले वचन पाळण्यासाठी सत्तेचा मोह असा बाजूला सारून १४ वर्ष वनवासाला जाणारे प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे आदर्श आहेत. त्याचवेळी मोठ्या भावाचा सत्तेवर हक्क असतानाही त्याला वनवासात जावे लागते आणि आपल्याला गादीवर बसवले जाते हे मान्य न झाल्यामुळे प्रभू रामचंद्राचे धाकटा बंधू भरत याने रामाच्या पादुका गादीवर ठेवून राज्यकारभार केला आणि वनवास आटोपून प्रभू राम परत आल्यावर भारताने बिना तक्रार त्याला राज्य बहाल केले होते, हे देखील विसरता येत नाही.त्याचबरोबर ज्या माय बापाने जन्म दिला ते वसुदेव आणि देवकी तसेच ज्या मातापित्यांनी पुत्रवत प्रेम करून सांभाळ केला आणि लहानाचे मोठे केले ते यशोदा आणि नंद या दोघांनाही सारखाच मान देऊन त्यांचा प्रतिपाळ करणारा भगवान श्रीकृष्ण हा देखील आमचा आदर्श आहे. देवकी आणि वसुदेव हे कंसाच्या कैदेत होते. भगवान श्रीकृष्णानेच त्यांची सुटका केली असेही इतिहास सांगतो. रामाने रावणाला मारून शत्रूचा नि:पात जरूर केला. मात्र त्या बदल्यात लंकेचा मोह ठेवला नाही. तसेच कृष्णानेही अनेक असूरांना ठार मारले. मात्र तिथेही क्रौर्याची परिसीमा कधीच गाठली गेली नाही. कौरव पांडवांच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले. पांडवांना संपूर्ण सैनिकी सामर्थ्य दिले. मात्र पांडव युद्ध युद्ध जिंकताच भगवान श्रीकृष्ण सहज बाजूला होऊन गेले होते. त्यांनी सत्तेचा मोह ठेवला नव्हता. हे सर्व मुद्दे लक्षात घेत मनुस्मृतीत अशा प्रकारे क्रौर्याची शिक्षा देण्याच्या नोंदी आहेत हे कोणालाच पटणारे नाही.
औरंगजेबाने शिखांचे धर्मगुरू तेगबहादुर यांनाही हाल हाल करून मारले होते. त्यांचेच वंशज असलेल्या दोन मुलांना भिंतीत चिणून ठार केले होते. अशा प्रकारचे क्रौर्य कोणत्याही हिंदू राजाने केल्याचे भारतीय इतिहासात नोंदले गेलेले नसावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हत्तीच्या पायी देणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी देणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा गद्दारांना जरूर ठोठावल्या. मात्र औरंगजेब करायचा तसे हाल हाल कोणाचेही केले नाहीत.
औरंगजेबाने असे अनेकांचे हाल हाल करून त्यांच्या हत्या केल्या, अशा इतिहासात नोंदी सापडतात. औरंगजेबाला मरण महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आले. मृत्यूच्या वेळी औरंगजेब म्हणाला की कयामतच्या वेळी अल्ला मला विचारेल की तू इतकी पापे का केलीस? त्याचे उत्तर मी माझ्या गुरुने दिलेल्या आदेशानुसारच हे केले असे स्पष्ट करीन अशाही नोंदी औरंगजेबाच्या चरित्रात असल्याची माहिती मिळते. औरंगजेबांचा हिंदू द्वेष किती होता याचे आणखी एक उदाहरण इतिहासकारांनी सांगितले. त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक हिंदूच्या मृत्यूची नोंद तो करताना तो त्या मृतकाचा उल्लेख काफीर असाच करत असे, आणि तो जहननमध्ये म्हणजेच नरकात जाण्याची तारीख अशी नोंद औरंगजेब करत असे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतही औरंगजेबाने अशाच नोंदी केल्या असल्याची माहिती मिळते. औरंगजेबाचे गुरु जैनुद्दीन खिस्ती हे होते. त्यांचीही कबर औरंगजेबाच्याच कबरेच्या बाजूला खुलताबाद येथे आहे.
औरंगजेबाच्या पदरी एक कवी भूषण नामक प्रसिद्ध कवी होता. त्याने औरंगजेबावर वेळोवेळी वेगवेगळी कवने केली आहेत. त्यातील एका कवनाचा मी भावार्थ वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे. या कवितेत कवी भूषण म्हणतो की”औरंगजेबा ऐक, काबाच्या दगडाप्रमाणे पवित्र असलेल्या आपल्या बापाला शहाजहानला तू कैद केले, हे तुझे कृत्य म्हणजे मक्केला आग लावणे इतकेच अपवित्र आहे, एका आईच्या पोटी जन्मलेला तुझा वडील भाऊ दारा त्याला पकडले दुसरा भाऊ मुरादबक्ष याच्याशी कपट कारस्थान करून त्याला न मारण्याची शपथ तू कुराणावर हात ठेवून शपथ घेतली असतांनाही तू त्याचीच हत्या केली.” औरंगजेबाच्या सत्तालोलूप आणि क्रूर मानसिकतेचे यथार्थ वर्णन या कवी भूषणने या कवनात केलेले आहे.
जर हुसेनभाई म्हणतात तसे औरंगजेबाने मनुस्मृतीतील नोंदीनुसार ही अत्यंत क्रूर अशी शिक्षा दिली होती. तर प्राचीन काळी मक्का मदीनेत मूर्ती पूजा करणाऱ्यांनाही असेच हाल हाल करून मारले होते, अशा नोंदी सापडतात. आजही इराण इराक अफगाणिस्थान अशा आणि इतरही मुस्लिम बहुल देशांमध्ये अशाच क्रूर शिक्षा दिल्या जातात. त्यादेखील मनुस्मृतीच्या तरतुदीनुसारच आहेत का तेही मनुस्मृीच्या तरतुदीनुसारच आहेत का, याचाही खुलासा व्हायला हवा. जर त्या मनुस्मृतीच्या नोंदीनुसार होत असतील तर मग हिंदू धर्मग्रंथांना जागतिक स्तरावर मान्यता मिळते आहे याचे समाधान मानायला हवे.
हुसेन दलवाई हे मूळचे समाजवादी विचारसरणीचे, ते आधी समाजवादी पक्षातच होते. नंतर ते काँग्रेसमध्ये आले एकंदरीतच अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो. हुसेनभाई विधान परिषदेत सदस्य असताना मी नेहमी विधान परिषदेत पत्रकार म्हणून वृत्त संकलन करण्यासाठी जात असे. त्यामुळे त्यांचा माझा चांगला परिचय आहे. एक अभ्यासू संवेदनशील राजकारणी म्हणून मी त्यांना ओळखतो. तरीही त्यांनी असे हास्यास्पद विधान का करावे हाच प्रश्न मला सतावतो आहे.
आपल्या देशात काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी कायम हिंदुत्वाला विरोध करत मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माला उचलून धरण्याचे उद्योग कायम केलेले आहेत. समाजवादीही त्यातच सहभागी आहेत. यांनी गेल्या शंभर वर्षांत हिंदूंचे असे अनेक बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळा सुरू असताना नाशिकचे एक कथित पुरोगामी पत्रकार निरंजन टकले यांनी महाकुंभ हा पौराणिक प्रकार नसून बादशहा अकबराने हिंदूंना खुश करण्यासाठी सुरू केला होता असा हास्यास्पद दावा केलाच होता ना. त्यावरही बरीच टिकाटिपणी झाली होती.नुकताच छावा हा चित्रपट प्रसाद प्रदर्शित झाला. त्यात औरंगजेबाने संभाजी महाराजांचे जे हाल केले, ते बघून हिंदू जनमानसात संतापाची लाट उठलेली आहे. त्यातच महाराष्ट्र विधानसभेतील एक आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर स्तुती सुमने उधळण्याचा उद्योग केल्यामुळे जनमत जास्तच क्षुब्ध झालेले आहे. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना सुनावलेली शिक्षा मुस्लिम कायदा शरीयातील तरतुदीनुसार होती हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मात्र ही बाब खोटी ठरवण्यासाठी हा मनुस्मृतीतील तरतुदींचा कथित आधार घेण्याचा अव्यापारेषु व्यापार हुसेन दलवाईंनी केलेला दिसतो आहे.
गेल्या १०० वर्षात या काँग्रेसी, समाजवादी आणि डाव्या मंडळींनी हिंदूंच्या जाती-जातीत भेद निर्माण करून ते असंघटित कसे राहतील हाच प्रयत्न केलेला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी प्रयागराज येथे ऐतिहासिक असा महा कुंभमेळा पार पडला. त्यानिमित्ताने जगभरातील जवळजवळ ६६ कोटी हिंदू बांधव एकत्र आले होते. जगात एखाद्या धर्माचे नागरिक धर्माच्या आधारावर एकत्र येण्याच्या संख्येचा हा उच्चांक होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या या काँग्रेसी, समाजवादी आणि डाव्या मंडळींनी हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो आहे. आतापर्यंत याच मंडळींनी मनुस्मृति हा ब्राह्मणांचा ग्रंथ असून या ग्रंथानुसारच शूद्रांवर अत्याचार करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इथे मनुस्मृति आली की आज महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने संघटित झालेल्या हिंदूंमध्ये पुन्हा अभिजन आणि बहुजन असे विभाजन होईल. हिंदू संघटित होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागेल, या अंदाजाने हुसेन दलवाईंनी ही खेळी खेळली असावी असा तर्क करण्यास निश्चितच वाव आहे.
मात्र हुसेन दलवाई यांची ही खेळी यावेळी तरी यशस्वी होईल अशी चिन्ह दिसत नाहीत. त्यांच्या बोलण्याने या देशातील किंवा हमिद इंजिनियर यांच्यासारखे धर्मांध मुस्लिम कदाचित खुश होतील. मात्र आता हिंदूंमध्ये असे अभिजन आणि बहुजन असे विभाजन होण्याची शक्यता फारशी राहिलेली नाही. आता मुस्लिम समाजाच्या तुलनेत हिंदू समाज हा जास्त सुशिक्षित होत आहे. अद्यापही मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत हिंदू सर्वच जाती-धर्मात पुढे येऊन शिक्षणाचा लाभ करून घेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे बुद्धिभेद करण्याच्या प्रयत्नाला हिंदू बहुजन फारशी दाद देतील असे वाटत नाही. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाही अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. एक पत्रकार म्हणून मी फडणवीस यांना देखील चांगला ओळखतो. फडणवीस कोणत्याही मुद्द्यावर अभ्यास करूनच बोलतात. हवेत मुद्दे ते सोडत नाहीत, याचे भानही हुसेन दलवाई यांनी ठेवायला हवे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता हुसेन दलवाई यांची ही वक्तव्ये निराधार बिनबुडाची आणि बेताल तसेच हास्यास्पदही आहेत असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. मासरे आलमगीर हा ग्रंथ फारसी भाषेत आहे. त्या काळात इतर समकालीन फारशी लेखकांनीही औरंगजेबावर बरेच ग्रंथ लिहिलेले आहेत. हुसेन भाईंनी त्याचा सखोल अभ्यास करावा मगच देवेंद्र फडणवीस यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला द्यावा इतकेच इथे सुचवावेसे वाटते. तसेही हुसेनभाई सध्या महाराष्ट्राचे विधिमंडळ किंवा दिल्लीतील संसद या कोणत्याही सभागृहात सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना अभ्यास करायलाही पुरेसा वेळ मिळू शकेल असे वाटते.
– अविनाश पाठक