संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील एकूण 77 गावांपैकी बहुधा गावात अजूनही स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच वा नदीच्या काठी अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे वास्तव आहे.यानुसार कामठी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा गावासह गारला,सावळी, बिडगाव, कुसुम्बि, टेमसना,सुरादेवी व चिखली गावात अजूनही स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याचे दिसून येते.
गरीब असो वा श्रीमंत कमी अधिक प्रमाणात जीवन जगण्यासाठी संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो परंतु काहींच्या मृत्यूनंतर हा संघर्ष थांबतो तर काहींना मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी सुद्धा संघर्ष सुरूच ठेवावा लागतो याचा प्रत्यक्ष अनुभव स्मशानभूमी नसलेल्या व नदी वा तुटलेल्या स्मशान शेड मध्ये केलेल्या अंत्यसंस्कारित नातेवाईकांना आला आहे.स्मशानभूमी नसलेल्या गावात स्मशान भूमी ची व्यवस्था नसल्याने मृत व्यक्तीवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात अशातच गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पावसाळ्यात पाऊस सुरू असताना झाल्यास अंत्यसंस्कार करतेवेळी कुटुंबियांना व नातेवाईकाना एका फार मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागते .तेव्हा प्रशासनाने जीवनातील संघर्ष भोगल्या नंतर मृत्य नंतरच्या मरणयातना थांबविण्यासाठी ग्रामीण भागातील गावागावात स्मशानभूमी उभारण्याची व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची गरज आहे असे झाले तरच ग्रामीण भागातील नागरिकांचे अंत्यसंस्कार सोयीने पार पाडता येतील.
कामठी तालुक्यातील येरखेडा गावाच्या विकासासाठी शासनाकडून कोटीच्या घरात निधी प्राप्त झाला आहे मात्र आज इतके वर्षे लोटूनही गावात स्मशान भूमीची व्यवस्था करू शकले नाही ही एक शोकांतिकाच मानावी लागेल..