– अपघातात मायलेक ठार, नातु बचावला
– कांद्री चेकपोस्ट जवळील अन्नपुर्णा ढाब्याजवळील हृदयद्रावक घटना
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कान्द्री चेक पोस्ट जवळील अन्नपूर्णा ढाब्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात होऊन मायलेक जागीच ठार तर दोन वर्षांचा नातू बचावल्याची घटना आज दि.१ जानेवारी रोजी दुपारी २.३० सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, मृतक अमित अंताराम चचाने वय २० वर्ष, व आई सुर्यलता अंताराम चचाने वय ४५ दोन्ही रा.बोरडा व नातू प्रियांशु कवडू कोहळे वय २ वर्ष. रा.भोंदेवाडा हे एम.एच ३१ ए.व्ही ५४०९ क्रमांकाच्या दुचाकीने कान्द्री चेक पोस्ट कडून मनसरकडे जात होते. दरम्यान कान्द्री चेक पोस्ट मागे टाकून पुढे अन्नपूर्णा ढाब्याजवळ पोहचताच अचानक दुचाकीस्वाराचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहनचालक व त्याची आई दोघेही रस्त्याच्या मध्यभागी पडले व नेमके याचवेळी मागेहून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या कचाट्यात आल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झाला.
सुदैवाने सोबत असलेला लहान बाळ रस्त्याच्या बाजूला पडल्याने या अपघातात तो पूर्णपणे बचावला असून बाळाला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे. अपघात होताच अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना मिळताच अंबुलेन्स टीम डॉ.हनवत आणि त्यांचे सहयोगी यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली.व मृतकांना शवविच्छेदनकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.
सर्वच नवीन वर्षाच्या निमित्ताने आनंद साजरा करतात मात्र वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा विचित्र आणि गंभीर अपघात घडल्याने संपूर्ण बोरडा गावात पूर्णतः शोककळा पसरली आहे.