नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.०७ ) बैठक पार पडली.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाच्या प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सूलभा शेंडे, डॉ वर्षा देवस्थळे, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शिंदे, यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी उच्च जोखीम क्षेत्र निश्चित करून त्याची नियमित तपासणी करण्यात यावी, झोन आरोग्य अधिकारी यांनी उच्च जोखीम क्षेत्रात नियमित प्रत्येक्ष भेट द्यावी. लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांची एक यादी तयार करून त्यांचे लसीकरण करण्यात यावे. ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावी, गरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावे, लसीकरणासाठी आशा अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घ्यावे, आदी सूचना अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिल्या.
बैठकीत सर्वप्रथम प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी गत महिन्यात लसीकरणापासून वंचित व उशिरा झालेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. तर जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नियमित लसीकरणाचा आढावा सादर केला.