– संत्रा प्रक्रिया प्रकल्प निर्माण करण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक !
मोर्शी :- नागपूरी संत्रा म्हणजे अमरावती नागपूर जिल्ह्याची ओळख निर्माण करून विदर्भाचे अर्थकारण आणि बळीराजाचे पोषण करणारा आहे मात्र आज तोच संत्रा नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. २० वर्षांपूर्वी हजारो हेक्टरमधील संत्रा आज फार कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे. ही विदर्भासह ऑरेंज सिटी’ म्हणून मिरविणाऱ्या उपराजधानीसाठी धोक्याची घंटा असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी पुढाकार घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची आग्रही मागणी मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे करण्यात आली.
आज कापूस उत्पादकांपाठोपाठ संत्रा उत्पादकही मरतो आहे. संत्रा पिकाचा खर्च वाढतो आहे, आणि बाजारभाव मात्र मातीमोल होत आहे. यंदा विदर्भात संत्र्याचे भरघोस पीक आले. त्यामुळे यावर्षी तरी शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळेल. त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर थोडा कमी होईल. त्याला मुलीचे लग्न आनंदात करता येईल. असा विचार केला जात होता. परंतु त्याचा संत्रा बाजारात पोहोचण्यापूर्वीच तो मातीमोल झाला. १८ ते २० हजार रुपये प्रति टन किमतीचा संत्रा १ हजार रुपये भावाने विकू लागला.
बांगलादेश सरकारने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2019 मध्ये 20 रुपये प्रति किलोग्रॅम असे आयात शुल्क होते. ते गेल्या नोव्हेंबर महिन्यात वाढविण्यात आले. हे शुल्क आता 88 रुपये प्रति किलोग्रॅम करण्यात आले आहे. या निर्णयाचा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. आयात शुल्क चौपट झाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे निर्यात घटली आहे.
संत्र्यावर संशोधन करण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र उद्यानविद्या विभाग आहे. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन होतांना दिसत नाही. मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर यांनी तातडीने संत्रा बागांची पाहणी करून संत्रावरील विवीध रोगांवर उपाय योजना करावी, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात यावे. मोर्शी वरूड तालुक्यात ५० हजार हेक्टर वर संत्रा असून संत्रावर प्रक्रिया करणारे कारखाने किंवा उद्योग या भागात नाही, हि फार मोठी शोकांतिका आहे . ज्याप्रमाणे नाशिक मध्ये द्राक्षावर प्रक्रिया करणारे कारखाने किंवा उद्योग मोठ्या प्रमाणात असून तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होत आहे, याच धर्तीवर मोर्शी वरूड तालुक्यात संत्रावर प्रक्रिया करणारे कारखाने किंवा उद्योग झाल्यास नक्कीच फायदा होईल.
मोर्शी वरूड तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रकल्प निर्माण करण्यात यावा. हीवरखेड दापोरी येथील जैन फॉर्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्प सुरू करण्यात यावा. शालेय पोषण आहारात संत्राचा समावेश करण्यात यावा. दर्जेदार संत्रा उत्पन्न करण्यासाठी संत्राचा सुधारित जाती निर्माण करण्यात याव्या, संत्रा निर्यातीकरिता आवश्यक त्या सोई सुविधा निर्माण करण्यात याव्या, बांगलादेशमध्ये सर्वात जास्त नागपुरी संत्रा निर्यात होतो त्याकरिता पणन महामंडळाचे कार्यालय बांगलादेशमध्ये सुरू करावे, सार्क देशामध्ये संत्रा निर्यातीकरिता प्रयत्न करावे, संत्रा ज्यूस प्रक्रिया कारखाने निर्माण करण्यात यावे, एन आर सी सी कार्यालय नागपूर येथून मोर्शी वरूड तालुक्यात स्थलांतरित करण्यात यावे. चांगल्या प्रकारच्या जातिवंत संत्रा कलमा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात याव्या. एन आर सी सी तर्फे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. संत्राचा खप वाढविण्याच्या दृष्टीने संत्राचे आहारातील महत्व व पोषण मूल्य जनतेसमोर आणून जनजागृती करावी, प्रदर्शन, चर्चासत्र, माहिती फलक, इत्यादी बाबींसाठी जाहिरात व उपभोक्ता जनजागृती अभियान राबवावे, दूरदर्शन व आकाशवाणी द्वारे संत्राची जाहिरात करावी, तसेच संत्राचा खप वाढविण्यासाठी संत्रा ज्यूस चा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा, एस टी स्टँड व रेल्वे स्टेशनला संत्रा विक्रीसाठी, संत्रा ज्यूस पार्लरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष वृषालिताई विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, आत्मा समितीचे अध्यक्ष उमेश गुडधे, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, ऋषिकेश विघे, विनोद ठोके, अशोक ठोंबरे, यांनी नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांच्याकडे केली असता खासदार अमर काळे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
संत्रा नगरी म्हणवणाऱ्या संत्रा उत्पादकांसाठी संत्रावार प्रक्रिया करणारा एकही संत्रा प्रकल्प उभारल्या गेला नसल्यामुळे संत्रा प्रक्रियेअभावी येथील संत्रा उत्पादक हे बांगलादेशला २ लाख टन संत्री पाठवितात. मात्र आयात शुल्क वाढवल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संत्रा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. एकप्रकारे संत्रा उत्पादकांवर अन्याय होत आहे. यासाठी मी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प निर्माण करण्यासाठी, आयात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वाहतूक व पॅकेजिंगसाठी अनुदान यासह संत्रा उत्पादकांच्या विवीध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– अमर काळे खासदार वर्धा लोकसभा