सद्यस्थितीत औषध फवारणीवर फोकस ठेवा
नागपूर :- ‘लम्पी त्वचारोग’ हा पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात थैमान घालून आता महाराष्ट्रात वेगाने पसरतांना दिसत आहे. लम्पी त्वचारोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी आज दिल्या.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक, उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
लम्पी चर्मरोग सर्वत्र पसरत असून कोरोना काळातील परिस्थितीप्रमाणे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळा. केंद्र सरकारच्या 2009 च्या ॲक्टनुसार पशुधनास वेळेवर उपचार मिळाले पाहिजे याची काळजी घ्या, अशा सूचना प्रधान सचिवांनी संबंधितांना दिल्या.
गाय, म्हैस व बैलांची आंतरराज्यीय वाहतूक बंद करा जेणेकरुन तेथील पशुधनाला लागलेल्या रोगाचा प्रसार व प्रार्दुभाव येथे होणार नाही. सर्वसाधन सामुग्री उपलब्ध ठेवा. निधीची कमतरता पडणार नाही. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 10 हजार व्हॅक्सीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यासोबतच औषधांचा साठा तयार ठेवा, शक्यतो खाजगी डॉक्टरांकडून उपचार न करता शासकीय पशुवैधकाकडूनच पशुंचा उपचार करा, अशी सूचना त्यांनी केली.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाची मदत घ्या. प्रत्येक गावात फवारणी करुन बाधीत व अबाधीत रुग्ण जनावरांचे विलगीकरण करा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी किंवा त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांनी बाधीत गावास भेट दयावी, असे त्यांनी सांगितले. या मोहिमेत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना विश्वासात घ्या व लम्पी चर्मरोगाबाबत ग्रामीण भागात सर्वदूर जनजागृती करा, अशा सूचना दिल्या.
सरपंच व ग्रामसेवकांना मागदर्शन करुन रुग्ण पशुंचे विलगीकरण, बाजार बंदी या कडे लक्ष देण्याच्या सूचना कराव्यात. लक्षणे असलेल्या पशुना तत्काळ मोफत उपचार व औषधोपचार करावे. खाजगी डॉक्टरांची कार्यशाळा घेऊन त्यांची मदत घ्यावी. शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद प्रशासनाने लक्षणे दिसताच पशुंवर उपचार करावे व टोल फ्री क्रमांक 1962 वर माहिती द्यावी. राज्यात 4 हजार 850 दवाखाने आहेत. येथील डॉक्टरांनी स्वत: भेट देऊन उपचार करावा, असे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करावी व पशुवरील लम्पी चर्मरोगाचा प्रार्दुभाव थांबवावा. 3 लक्ष व्हॉक्सीन उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच 50 हजार लस प्राप्त होणार असून लसीकरण करुन घ्यावे. यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी इटनकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना बाधीत गावात जाऊन प्रत्यक्ष उपचार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांची नाव नोंदणी करावी. प्रार्दुभाव वाढू नये यावर नियंत्रण ठेवा. खाजगी डॉक्टरांची सुध्दा वेळ पडल्यास मदत घ्या. एपी सेंटर परिसरातील पाच किलो मीटर वरील सर्व गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घ्या व जनजागृती करा. औषध फवारणीच्या कामावर फोकस ठेऊन तत्काळ कार्यवाही करा. जनावरांना गावात एकत्रित आणून बाधीत व अबाधीत विलगीकरण करुन फवारणी करा. यामुळे वेळ व पैशाची बचत होईल, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.