सरकारने महानिर्मितीतील कंत्राटी कामगारांना पर्मनंट करावे –  राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुषण चंद्रशेखर यांची मागणी

नागपूर :- ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नुकताच मोठा निर्णय घेतला असून राज्यातील कंत्राटी कायदा बंद करून कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड केली आहे. त्याच तत्वावर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने महानिर्मिती वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत रुजू करावे. हीच दिवाळी भेट होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी केली आहे.

देशात क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९ व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११ व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. त्यांनी संपूर्ण ओडिशा राज्यात कंत्राटी कामगारांना परमनंट करण्याची घोषणा केली. आपला महाराष्ट्र हे भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य असून सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. आपल्या राज्यातील कंत्राटी कामगार संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने वित्तीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण टप्प्या टप्प्याने यावर तोडगा काढणे शक्य आहे. त्याची सुरुवात महानिर्मिती वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांपासून करावी, कोरोना सारख्या जीवघेण्या काळात अहोरात्र मेहनतीने कर्तव्य बजावणाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. यानंतर राज्यातील सर्वच क्षेत्रात कार्यरत कंत्राटी कामगारांना पर्मनंट करण्याचे सत्कार्य करण्यास सोयीस्कर होईल. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.

यापूर्वी महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यातील सांस्कृतिक आदानप्रदानाच्या वृद्धीसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार दोन राज्यांमध्ये कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण सुरू आहे. आदर्श समोर असल्याशिवाय कृती घडत नाही. ओडिशा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र सरकारने आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत पर्मनंट करण्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन राज्यातील कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी भुषण चंद्रशेखर यांनी केली.

“सरकारने ‘पर्मनंट’ हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यास कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या प्रथेला कायमची मुठमाती मिळेल. सरकार वेळोवेळी कामगारांच्या हिताचे शासन निर्णय प्रसिद्ध करते. पण वीज केंद्राचे अधिकारी तुटपुंज्या लाभासाठी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. यामुळे कामगार शोषणास बळी पडतो.”

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com