‘लम्पी’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा  – डॉ. माधवी खोडे-चवरे

प्रत्येक जिल्ह्याला डिपीसीतून एक कोटी निधी

 पशुधन पर्यवेक्षकांची 53 पदे भरणार

नागपूर :-  पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्यस्त्रोताव्दारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही गतीने करावी, असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज दिले.

राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला मुबलक लसी उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनावरांवर लक्षणे दिसताच औषधोपचार केल्यास जीवितहानी होणार नाही. त्यामुळे गोपालक व शेतकऱ्याने पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत लम्पी चर्मरोग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलींदकुमार साळवे,  आशा पठाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.

डॉ. खोडे-चवरे म्हणाल्या, पशुधनावरील लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्सगित क्षेत्रातील पशुधनांचे लसीकरण, गुरांची खरेदी-विक्री बंदी, जनावरांच्या गोठ्यात किटकनाशकांची फवारणी, पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात. पशुधनांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दहा हजार याप्रमाणे लसींचा पुरवठा होणार आहे. ज्या गावातील जनावरांना लम्पी सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत, तेथील नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवावेत. पशुसंवर्धन विभागाने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा व लक्षणे दिसणाऱ्या गुरांवर तत्काळ उपचार करावे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. निरोगी जनावरांमध्ये आजाराची प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही जनावरे वेगळी ठेवण्याबाबत प्रत्येक गावांत ग्रामपंचायतीमार्फत सूचना द्याव्यात. तसेच प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नागरिकांची व पशुपालकांची यासंदर्भातील भिती घालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

लम्पी चर्मरोग सर्वत्र पसरत असून कोरोना काळातील परिस्थितीप्रमाणे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळा. केंद्र सरकारच्या 2009 च्या ॲक्टनुसार पशुधनास वेळेवर उपचार मिळाले पाहिजे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. पशुधनांवर तत्काळ उपचार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती योजनेतून प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पशुधनांचे उत्तमरित्या रक्षण करण्यासाठी प्रभावी नियोजन व उपाययोजनांना गती द्यावी, असे डॉ. खोड-चवरे यांनी यावेळी सांगितले.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी लम्पी सदृश आजारासंदर्भात त्यांच्या जिल्ह्याच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांना माहिती दिली. पशुसंवर्धन उपायुक्त श्रीमती पुंडलिक यांनी पशुवैद्यकीय रुग्णालय, उपलब्ध लस व औषधी साठा, मनुष्यबळ यासंदर्भात बैठकीत माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ सुंदर नागपूरसाठी आज 'प्लॉग रन' 

Sat Sep 17 , 2022
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत केंद्र शासनाने ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका ‘नागपूर निती’ या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छ सुंदर नागपूरसाठी ‘प्लॉग रन’चे आयोजन सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. अमरावती रोड स्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!