संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यातील शेत व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार पोयाम
कामठी :- शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्राचा उपयोग वाढला आहे.यांत्रिकी कारणामुळे शेतीमध्ये पेरणी,आंतरमशागत, कापणी,मळणी व इतर कामे करण्यासाठी ,यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरिता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शेतरस्त्यावरील अतिक्रमण काढुन त्यांचे बंधकाम करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत/पांदण रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ता योजनेला शासनाने मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत /पानंद रस्ते योजने अंतर्गत कामठी तालुक्यातील शेत व पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्या रस्त्याचे मजबुती करण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे तेव्हा कामठी तालुक्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी अर्जदारांनी सदर योजने अंतर्गत कामठी तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करून मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पानंद रस्ते योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
सदर अभियान यशस्वी करण्यासाठी कामठी तालुका समितीवर तालुकास्तरीय कार्यकारी समिती नेमण्यात आली असून या तालुकास्तरीय कार्यकारी समितीत अध्यक्षपदी तहसीलदार अक्षय पोयाम, सहअध्यक्षपदी गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, सदस्यपदी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक,जिल्हा परिषद (बांधकाम) उपअभियंता चा समावेश आहे.
प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा ,या उद्देशाने गाव समृद्ध करण्यासाठी शेतरस्त्यांचे महत्व शहराना जोडणाऱ्या महामार्गाच्या महत्वाएवढे आहे.पानंद रस्त्याच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा येतात आणि त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीकही घेत नाही त्यामुळे प्रमाणित दर्जाचे शेत /पानंद रस्ते तयार करण्याकरिता कामठी तालुक्यात ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पानंद रस्ते योजना राबविण्यात येत असून पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त अभियान नागपूर 2023-24हे यशस्वीरीत्या राबविण्यासाठी 16 मार्च ते 20 मे पर्यंत अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार कामठी तहसील कार्यालयात 15 एप्रिल 2023 पर्यंत नागरिकांचे तक्रार अर्ज स्वीकारण्यात येतील.30 एप्रिल पर्यंत आलेल्या तक्रार अर्जावर चौकशी अँती कारवाही करण्याचे आदेश देणार ,तसेच 16 मार्च पासून प्राप्त अर्जावर 15 मे 2023 पर्यंत तपासणी व चौकशी करण्यात येईल व 20 मे ला तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्यात येईल.