नागपूर :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेजबाबदार, भडकावू आणि देशद्रोही वक्तव्य करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब टाकरे गट) नेते संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
ॲड. मेश्राम यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र व नागपूर पोलिस आयुक्त यांना तक्रारीसंदर्भात पत्र पाठविले आहे.
संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत “दफन” करण्याची धमकी दिली. हे वक्तव्य प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न जनतेची दिशाभूल करणारा आणि समाजांमध्ये फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकीच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम तक्रारीत म्हणाले.
संजय राऊत यांचे पंतप्रधानांच्या विरोधातील विधान मुक्त आणि नि:ष्पक्ष निवडणुकीच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्च मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा भडकावू विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवित ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवडणूक आयोगाद्वारे आणि पोलिस प्रशासनाद्वारे या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकावू भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती तक्रारीतून केली आहे.