स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार – राजदूत डॉ. राल्फ हेकनर

मुंबई :- भारतात किमान 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 150 एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंड साठी सर्वात महत्वाचे राज्य असून भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्वित्झर्लंड प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत डॉ राल्फ हेकनर यांनी केले आहे.

डॉ. राल्फ हेकनर यांनी मंगळवारी (दि. 30) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे येथे नुकतीच आपण सार्वजनिक व खासगी विद्यापीठांच्या प्रमुखांशी भेट घेतली. विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा व्यापाराला लाभ व्हावा, याकरिता स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने उद्योग व विद्यापीठांसाठी एक सामायिक ‘नाविन्यता व्यासपीठ’ (‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’) सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले.

या व्यासपीठावर आयआयटी सारख्या संस्थांना देखील घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो 22 देशांमध्ये राबविला जाईल, असेही ते म्हणाले.

“स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघाची व्यापार, आरोग्य विषयक कार्यालये आहेत. तसेच दावोस येथे दरवर्षी जागतिक आर्थिक परिषद होते. या दोन्ही ठिकाणी भारताचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे भारताच्या मताची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते”, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तोवर भारताला विकसित राष्ट्र करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे नमूद करून या उद्दिष्ट प्राप्तीसाठी भारत – स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार होणे आवश्यक असल्याचे हेकनर यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड – भारत मुक्त व्यापार करार झाल्यास कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील, याची माहिती धोरणकर्त्यांना तसेच उद्योगजगताला देण्यासाठीच आपण मुंबई भेटीवर आलो असल्याचे डॉ. हेकनर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गानंतर स्विस दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड मात्रा उपलब्ध करून दिल्याबद्दल हेकनर यांनी भारताचे आभार मानले. स्वित्झर्लंडला भारताकडून अधिक गुंतवणूक तसेच नाविन्यता व संशोधन सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंड येथे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण केल्यामुळे दरवर्षी अडीच ते तीन लाख भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड भारताचा 11 वा मोठा गुंतवणूकदार देश असून मुंबईतील वाणिज्य दूतावास 108 वर्षांपासून कार्यरत असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. स्वित्झर्लंड सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व औषधीनिर्माण या क्षेत्रातील कौशल्यप्रधान देश असून उभय देशांत कौशल्य आदान – प्रदान करार झाल्यास भारतातील युवकांच्या कौशल्याचा अनेक देशांना फायदा होईल,असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांचा कुलपती या नात्याने उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – तसेच अध्यापक – आदानप्रदान वाढावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. बैठकीला स्वित्झर्लंडचे मुंबईतील वाणिज्यदूत मार्टिन माईर हे देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

Wed May 31 , 2023
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण ; सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com