मोदी ३.० मंत्रिमंडळाचा शनिवारी शपथविधी? ‘रालोआ’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘एनडीए’तील घटक पक्षांना विश्वासात घेऊन केंद्रातील मोदी ३.० सरकारचा मार्ग सुकर केला. पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी ८ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नसल्याने मोदी ‘एनडीए’च्या पाठिंब्यावर अवलंबून आहेत. दुसऱ्या बाजूला; विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून ‘एनडीए’तील जनता दल (सं)चे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना संपर्क केला जात होता. या दोन्हीपैकी एकाही घटक पक्षाने भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला असता तर े राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्रीच नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता व एनडीएच्या बैठकीमध्ये सरकार स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली होती.

मोदी काळजीवाहू पंतप्रधान

मोदींनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली. आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने केंद्रातील सरकार आघाडीचे असले तरी नीट कारभार करता येऊ शकेल, अशी ग्वाही मोदींनी मावळत्या सरकारमधील सहकारी मंत्र्यांना दिल्याचे समजते.

जनता दल, तेलुगु देशमकडून ग्वाही

मोदींच्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी एनडीएच्या तासभर झालेल्या बैठकीत नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी मोदींना लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची सूचना केली. ‘एनडीए’ बरोबर असल्याची ग्वाही नायडू यांनी दिल्लीत येण्यापूर्वी विजयवाडा येथे दिली.

Source by loksatta

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपामध्ये मोठ्या घडामोडी, देवेंद्र फडणवीस आजच मोठा निर्णय घेणार? 

Thu Jun 6 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र भाजपामध्ये आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपाला एकट्याला बहुमत मिळालं नाही. पण भाजपाप्रणीत NDA कडे बहुमताचा आकडा आहे. NDA च संख्याबळ 292 आहे. भाजपाने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात त्यांना 240 जागा मिळाल्या. भाजपाला उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात मोठा फटका बसला. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com