अपघातात मृत्यू : एक्सिस बँकेच्या विमा योजनेतून ३४ लाखांचा धनादेश सुपूर्द
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामध्ये कार्यरत आणखी एका मृत जवानाच्या कुटुंबाला विमा योजनेतून आधार मिळाला आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकामध्ये (एनडीएस) कार्यरत सुबोध धर्मठोक या मृत जवानाच्या कुटूंबियांना शुक्रवारी (ता.३) मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी एक्सिस बँकेतर्फे देण्यात आलेला ३४ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. मृतक सुबोध धर्मठोक यांच्या पत्नी रुपाली धर्मठोक व मुले सौम्य (वय १३ वर्ष) आणि अद्विक (६ वर्ष) यांनी हा धनादेश स्वीकारला.
यावेळी सहायक आयुक्त प्रकाश वराडे, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, एक्सिस बँकेचे उपाध्यक्ष व सिव्हिल लाईन्स शाखेचे व्यवस्थापक विक्रम वच्छानी, वरीष्ठ व्यवस्थापक अनुराग डोये, सॅलरी हेड भरत पुरबिया, रिलेशनशिप मॅनेजर गणेश तिवारी, प्रियंका बुरबुरे, माजी सैनिक संघटनेचे छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान संगठन अध्यक्ष दिलीप सिंह सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
५ जुलै २०२२ रोजी कर्तव्यावर असताना सुबोध धर्मठोक या उपद्रव शोध पथकातील जवानाच्या दुचाकीला अपघात झाला. त्यांना तात्काळ कुणाल हॉस्पीटल येथे हलविण्यात आले. मेंदूला इजा झाल्यामुळे उपचारादरम्यान ९ जुलै २०२२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. उपद्रव शोध पथकाचे वेतन खाते एक्सिस बँकेमध्ये असून एक्सिस बँकेद्वारे पथकातील जवानांचा दुर्घटना विमा काढण्यात आला आहे.
दिवंगत सुबोध धर्मठोक यांच्या कुटुंबियांना विम्याचे ४४ लाख रुपये एक्सिस बॅंकेद्वारे देण्यात येणार असून विम्याच्या पहिल्या टप्प्याची रक्कम ३४ लाख रुपये दिवंगत सुबोध धर्मठोक यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आली. उर्वरित १० लाख रूपये दुस-या टप्प्यात त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे एक्सिस बँकेच्या अधिका-यांद्वारे सांगण्यात आले आहे.
वेतन खातेधारकांना एक्सिस बँकेद्वारे देण्यात येत असलेली दुर्घटना विमा सेवा ही अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार आहे. या सुविधेचे कौतुक करीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी एक्सिस बँकेच्या अधिका-यांचे आभार मानले.
याप्रसंगी लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे, हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे धनराज कावळे, गांधीबाग झोनचे सुशील तुप्ते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तरवटकर, लकडगंज झोनचे नत्थु खांडेकर, आशीनगर झोनचे संजय सोनोने, मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर उपस्थित होते.