खासदार सुनिल तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन…
मुंबई :- सुनील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडले त्यावेळी अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाचे कर्तृत्वाचे कौतुक केले.
तटकरे कोकणातील आहेत. कोकणातील लोकांना गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. कोकणी माणसांचा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे यांनी पुरेपूर उचलला आहे. विधीमंडळ किंवा विधीमंडळाच्या बाहेरची भाषणे ऐकल्यावर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याची सगळ्यांना खात्री पटते. साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विधीमंडळातील भाषण ऐकले तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आले की, त्यांच्या हातामध्ये कागदाची एक चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण करण्याची त्यांची शैली आहे. पवार यांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असेही अजित पवार म्हणाले.
लोकसभेचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या व आमदार पदाच्या काळात विधीमंडळात केलेल्या निवडक व अतिशय भावस्पर्शी भाषणांचे संकलन ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाच्यारुपाने प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार होते मात्र शरद पवार यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने आज त्यांना ॲडमिट व्हायचे असल्याने ते उपस्थित राहू शकले शकले नाहीत.
अभिनंदन… अभिवादन पुस्तकासाठी तटकरे यांचे अभिनंदन करण्याआधी या पुस्तकाची संकल्पना ज्यांना सुचली व प्रत्यक्षात आणली त्याचे कौतुक करतानाच अजित पवार यांनी त्यांना धन्यवाद दिले.
सुनील तटकरे यांची भाषणे ही सगळीच अभ्यासपूर्ण व भावस्पर्शी अशाप्रकारची होती. त्यांच्या असंख्य भाषणातून मोजकीच भाषणे या पुस्तकात निवडण्याचे अवघड काम केले गेले आहे. तटकरे यांच्या चाहत्यांना या एका पुस्तकातून आपण न्याय देऊ शकू ती गोष्ट अशक्य आहे असेही अजित पवार म्हणाले.
पुस्तक प्रकाशनाचा केलेला कार्यक्रम हा निश्चितच कौतुकास्पद आहे. तटकरे यांना न्याय देण्यासाठी एखादा महाग्रंथ देखील अपुरा पडेल असे मला वाटते. भविष्यात प्रयत्न केला तर महाग्रंथात रुपांतर करण्यास हरकत नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
त्याग, अनुभव आणि वक्तृत्वशैली आहे म्हणून भाषणे चांगली होतात असे नाही तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनात निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणे भावस्पर्शी होतात असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांना लोकांची कामे करण्याची खोड लागली आहे. ते दिल्लीत असले तरी त्यांचे बारीक लक्ष रायगड जिल्ह्यातील गाव तालुका इथे असते. सुनील तटकरे यांना एकदा अपयश मिळाले तरी खचून न जाता ते पुढे जात राहिले आणि ते मंत्री, पक्षाचे प्रमुख नेते आहेत आता दिल्लीत खासदार म्हणून चांगल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. अलीकडचा अपवाद वगळता कोकणाला सातत्याने चांगले, अभ्यासू, विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत त्यामध्ये मधु दंडवते, बॅ. नाथ पै, सुरेश प्रभू अंतुले यांच्या सारख्यांनी महाराष्ट्राचा कोकणचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवला तेच काम आता सुनील तटकरे करत आहेत. महाराष्ट्राचा गौरव आणखी पुढे न्यावा वाढवावा अशा प्रकारची अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केला.
उभा महाराष्ट्र मधु दंडवते यांना कोकण रेल्वे सुरू करण्याचे श्रेय देतो त्यामध्ये पवार यांचा महत्त्वाचा सपोर्ट होता आता मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेल्या दशकापासून रखडले आहे. मुंबई – गोवा महामार्गाचे काम तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लागले आणि ते लागावे, लोकसभा खासदार म्हणून त्यांचे महत्वाचे योगदान असावे, त्यांच्या माध्यमातून कोकणच्या, महाराष्ट्राच्या विकासाला अधिक चालना मिळावी अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.
तीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, आणि आता लोकसभा अशा विविध पातळ्यांवर काम केले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नोंद झाली आहे. तर मंत्री म्हणून ऊर्जा, अर्थ, जलसंपदा यासह इतर महत्वाची खाती त्यांनी सांभाळली आहे. तर राष्ट्रवादीचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत आणि आता दिल्लीत खासदार त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द सतत चढती राहिली आहे. त्यांच्या कारकीर्दीचा आलेख असाच चढता रहावा आणि महाराष्ट्राला, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वातून फायदा होत रहावा अशा प्रकारच्या शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या.
वसंतदादा, बॅ. अंतुले, आर. आर. आबा यांच्या कार्याचा प्रभाव तटकरे यांच्यावर पडला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मागे पडले नाहीत. उत्कृष्ट नेतृत्व कोकणाला नव्हे तर महाराष्ट्राला त्यांच्यारुपाने मिळाले आहे. राष्ट्रवादीचे सर्व खासदार संसदेत उत्कृष्ट ठसा उमटवत आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी कौतुक केले.
सुनील तटकरे हे निव्वळ राष्ट्रवादीचेच नाही तर राज्याचे नेते आहेत. हे चांगले नेतृत्व कोकणाने दिले आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.
पवार यांच्या सोबत राजकारणात आहेच परंतु मला राजकारणात आणणारे वसंतदादा होते आणि जास्त प्रेम अंतुले यांनी केले. इंदिरा गांधी यांचाही सहवास लाभला असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.
सुनील तटकरे यांची प्रश्न सोडवण्याची चिकाटी याही वयात पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक माणसं त्यांनी जोडली आहेत. त्यांच्या कामाची पद्धत बघितली तर त्यांनी मतदारसंघातील एकही काम करायचं सोडलं असेल वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुनील तटकरे यांच्या कामाचे कौतुक केले.
एक चांगलं अभ्यास करायला लावणारं पुस्तक आज पहायला मिळाले असेही जयंत पाटील म्हणाले.
कोकणातील माणसं साधी भोळी… हदयात भरलीय शहाळी असं म्हणत वेळप्रसंगी जशी आहे तशी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
योग्य वेळी हे पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. कारण आजच्या विधानसभेत या भाषणांची गरज आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
संघटना कशी वाढवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तटकरे आहेत अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुनील तटकरे यांचे कौतुक केले.रोहामध्ये कॉंग्रेसचं कार्यालय नव्हतं त्यावेळी स्वतः चं घर दिलं होतं असा किस्साही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला.
तटकरे यांची आकलनशक्ती कौतुकास्पद आहे. एखादी गोष्ट सांगितली तर ती करुन घेणारच.शक्यता – अशक्यता घेऊन जाणारा हा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्राचा विचार करणारा असा नेता मिळणे कठीण असल्याचेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या खासदारांच्या भाषणाची नोंद संसदेत घेतली जाते – सुप्रियाताई सुळे
सुनील तटकरे यांची भाषणे मी जवळून पाहिली आहेत. दिल्लीत राष्ट्रवादीचे खासदार कमी असले तरी पूर्ण ताकदीने दोन्ही सभागृहात बाजू मांडत असतात आणि ती भाषणे सर्वजण आवर्जून ऐकतात व भाषणाची नोंद संसदेत घेतली जाते. पंतप्रधान यांनीही राष्ट्रवादीचे कौतुक केले आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
संसदेत नियम व कायद्याने काम करणारा एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तटकरे यांच्या भाषणाच्यावेळी त्यांच्या हातात कागद नसतात. इतकं उत्तम भाषण ते करतात. तशीच पध्दत प्रफुल पटेल यांची आहे. सुनील तटकरे यांचा संसदेत इतका परफॉर्मन्स चांगला आहे की ते आम्हाला दिल्लीत हवे आहेत. महाराष्ट्रात त्यांची जेवढी गरज आहे तेवढी गरज दिल्लीत आहे हे वास्तव विसरून चालणार नाही हेही खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या लोकांच्या कामांसाठी ते कमीपणा मानत नाहीत. प्रत्येक मंत्र्यांकडे आपल्या मतदारसंघातील कामे घेऊन जात असतात. आपल्या लोकांचे काम आहे त्यासाठी दहा फेर्या माराव्या लागल्या तरी चालतील लोकांसाठी लढत राहणार आणि प्रयत्न करत राहणार ही भूमिका असते असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे पुस्तक लहान झाले आहे. ज्या माणसाची कारकीर्द एवढी मोठी आहे की ते जवळपास तीस वर्षे राजकारणात, समाजकारणात आहेत. पुणे जिल्हा हा सगळ्यात लवकर विकसित झालेला जिल्हा आहे तसा रायगड जिल्हाही लवकर विकसित करण्याचे काम आदिती तटकरे हिने पालकमंत्री म्हणून केला आहे. याशिवाय सुनील तटकरे यांनी उत्तम लोकप्रतिनिधी म्हणूनही काम करताना रायगड जिल्हा विकसित केला आहे.
एक हळवा आणि अभ्यासू माणूस या पुस्तकात पहायला मिळाला त्याचबरोबरच एक द्रष्टा नेता म्हणून डेव्हलपमेंट मॉडेल म्हणूनही आम्ही भाषणे ऐकतो त्याचाही उल्लेख पार्ट – २ मध्ये करता आला तर पुढच्या पिढीला पुस्तकात पहायला मिळेल असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यातील राजकारण कुठे चाललंय याची चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यापध्दतीने गलिच्छ राजकारण सुरू आहे तर आमच्यासारख्या महिलांना यासाठीच राजकारणात आलो का असे समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर जबाबदारी जास्त आहे. की सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जी यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली त्यात सातत्य ठेवून पुढे एक चांगला पक्ष आणि उत्तम राज्य चालवायचं आहे आणि त्यासाठी जे कष्ट करावे लागतील ते सर्वांनी करायचे आहेत असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
‘अरे हे काय चाललंय’ हे म्हणण्यापेक्षा याच्याविरोधात मी लढणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले त्याप्रमाणे देश चालेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालेल हा आग्रह, हा विचार यासाठी आपल्याला लढायला लागणार आहे. पुढची काही वर्षे जबाबदारी खूप असणार आहे. आज जे गलिच्छ राजकारण सुरू आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावर मात केली जाईल… लढेंगे भी और जितेंगे भी.. असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.