– बालजगतमधील कार्यकर्ता दिनाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा
नागपूर :- सुमती सुकळीकर यांनी अतिशय प्रतिकूल काळात विचारधारेशी प्रामाणिक राहून संघटनेचे कार्य केले. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनात त्यांना बरीच किंमत चुकवावी लागली. मात्र, आपण देशाच्या व समाजाच्या कल्याणासाठी काम करोय, अशी त्यांची भावना होती, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी लोकमाता सुमती सुकळीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दीनदयाल शोध संस्थान, बालजगत व ताई सुकळीकर सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमाता सुमती सुकळीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यकर्ता दिन आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. नितीन गडकरी बोलत होते. बालजगत येथे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे अध्यक्षस्थानी होते. तर सुमतीताईंच्या कन्या व कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार, प्रसिद्ध उद्योजक प्रभाकरराव मुंडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे व शालीनी खरे यांचा सत्कार करण्यात आला. ‘सुमतीताईंनी भारतीय जनसंघाचा विचार पुढे नेला. अतिशय संघर्षातून सामाजिक व राजकीय कार्य केले. या कामात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण संकटांची चिंता न करता त्यांनी संघर्ष केला,’ असेही ना. गडकरी म्हणाले. कार्यक्रमाला सुधा सोहनी, डॉ. उदय बोधनकर, ज्येष्ठ विधिज्ञ आनंद परचुरे, विनय देशपांडे, संजय बंगाले, दिलीप दिवे, प्रमोद तभाने, नरकेसरी प्रकाशन लि.चे प्रबंध संचालक धनंयज बापट आदींची उपस्थिती होती.