नवी दिल्ली :- मुंबई आणि दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ अॅक्शन मोडमध्ये आहे. दिल्लीत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बांधकाम, कचरा जाळणे आणि वाहने ही प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीसह आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरातील हवेची पातळी खालवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी म्हणजेच Air Quality Level हे खराब आणि गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. मुंबईतील प्रमुख शहरं असलेल्या देवनार, बीकेसी, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, कांदिवली, मालाड, शिवडी, माझगाव, चेंबूर, कुलाबा या ठिकाणी हवेची गुणवत्ता घसरल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळ अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली आहे. मुंबईतील एअर क्वॉलिटी इंडेक्स AQI १०६ वर पोहोचला आहे. हा इंडेक्स सध्या खराब स्थितीत पाहायला मिळत आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील AQI बिघडल्यास प्रदूषण निर्माण करणाऱ्या यंत्रणांवर बंदी घालण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे.
प्रदूषण करणाऱ्या यंत्रणांवर तात्काळ बंदी येणार?
मुंबईत मान्सून संपताच अनेक उपनगरांमध्ये AQI 10-12 वेळा खराब आणि गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. त्यामुळे देवनार, बीकेसी, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, कांदिवली, मालाड, शिवडी, मझगाव, चेंबूर, कुलाबा इत्यादी भागांत हवेची गुणवत्ता असमाधानकारक ते खराब श्रेणीत आहे. यामुळे ज्या भागात AQI हा सतत 200 किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्या भागांतील बेकऱ्या, रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पांसह प्रदूषण करणाऱ्या यंत्रणांवर तात्काळ बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा?
मुंबईतील प्रदूषण वाढण्यामागचे मुख्य घटक हे बांधकाम, कचरा जाळणे, वाहने आणि तंदूर-फ्रायिंग ओव्हन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच यावर उपाययोजना आखल्या जाणार आहे. तसेच रस्ते झाडण्याऐवजी धूळ शोषण करणाऱ्या मशीनचा वापर करण्याची शिफारस MPCBने शासनाला केली आहे. मात्र याची अंमलबजावणी कधी होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यासोबतच ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली बनली गॅस चेंबर
तर दुसरीकडे राजधानी दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. दिल्लीतील अनेक भागातील एअर क्वालिटी इंडेक्स हा 500 च्या वर पोहोचला आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील हवा ही अतिगंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे. यामुळे आता दहावी बारावीचे क्लास ऑनलाइन होणार आहेत. तर पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे प्रदूषणासंदर्भातील श्रेणी चार न हटवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सध्या दिल्लीत बी एस फोर डिझेल गाड्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.