– जिल्हास्तरीय ‘ आयुष्मान भव:’कार्यक्रमाची पाचगाव येथून सुरूवात
– नागपूर जिल्हयाला निक्षय योजनेतंर्गत राज्यस्तरीय पुरस्कार
नागपूर :- केंद्र व राज्य सरकारच्या बहुआयामी आयुष्मान भव: कार्यक्रमाची जिल्हास्तरीय सुरुवात नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथून आज करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या केंद्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमासोबतच सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे लक्षवेधणाऱ्या या योजनेचा शुभारंभ जिल्ह्यात झाला.
उमरेड विभागात येणाऱ्या पाचगाव आरोग्य केंद्र जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शानदार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उमरेडचे आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
आजपासून देशात आयुष्मान भवः मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्याच्या मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी “आयुष्मान भव:” ही महत्वांकाक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर पासून ही मोहीम सुरू करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा क्षयरोग नियंत्रण अंतर्गत निक्षय योजनेअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार राज्यस्तरावरून आज राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्याला देण्यात आला. क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्हयाने केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांची ही नोंद आहे.यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले.
२ ऑक्टोबरला आयुष्यमान ग्रामसभा
२ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान ग्रामसभा होणार असून ती आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या जाणीवजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नीत असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, त्यासाठी एक सप्टेंबर पासून आखणी करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
1 सप्टेंबर पासूनच्या नियोजनामध्ये आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्यमान सभा, आयुष्यमान मेळावा,अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांची तपासणी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय नियोजन करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये माहे डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक आठवड्याला एक एक शिबिर घेऊन लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथील कॅन्सर व्हन, टीबी रुग्ण वाहिका,एनसीडी स्क्रीनिंग, प्रधानमंत्री जन आरोग्य योजने कार्डचे वाटप, तसेच सिकलसेलची तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य कार्ड काढून घेण्याबाबत व या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी आयुष्यमान भव अंतर्गत करण्यात येणाऱ्या पुढील कॅम्पचे नियोजन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रेवती साबळे, उमरेड पंचायत समितीच्या सभापती नागभिडकर, जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर गुजरकर, सरपंच ठाकरे , तालुका आरोग्य अधिकारी उमरेड डॉ. संदीप धरमटोक,इतर सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ डोंगरवार व आभार प्रदर्शन डॉ. सुरेश मोटे यांनी केले.