नागपूर :- शहरात व जिल्ह्यात व्यसनांच्या आहारी प्रौढांसोबत युवक व युवतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर लवकरात लवकर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यासोबतच शाळकरी व महाविद्यालयीन मुलामुलींमध्येही हे प्रमाण वाढत असल्याने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. जिल्हा नशामुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
नशामुक्त भारत अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भुयार, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ. आसिफ इनामदार, भारती सराफ, एन.डब्यु मेश्राम, विजय शेंडे, डॉ. सचिन पिंपरे यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते.
‘करुन सर्व व्यसनांचा अंत, स्वच्छंद घ्या श्वास’ या उक्तीप्रमाणे नागपूर जिल्ह्यात नाशामुक्त मोहीमेची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश देतांना युवाशक्ती राष्ट्रशक्ती आहे त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करा. गावागावात शिबीरे घेवून अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत नागरिकांना अवगत करा. या मोहीमेला गती आणण्यासाठी गावागावात स्वयंसेवक नेमून त्यांना ओळखपत्र दया, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
2011 पासून व्यसनमुक्ती धोरण शासनाने ठरविले परंतु ज्या प्रमाणात व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती झाली नाही. शहरात व्यसनाधितेचा स्फोट होत आहे, यासाठी कठोर अंमलबजावणीची आवश्यकता असून पोलीस विभागाने याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
देशात 272 जिल्हे नशाग्रस्त आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या व्यसनाधिनतेला आळा घाला. शाळेच्या एक किलोमीटर अंतरावर कोणतेही टपरी किंवा दुकान राहणार नाही याची दक्षता घ्यावा. शाळा महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन, जयंत्या आदी कार्यक्रमात व्हिडिओद्वारे नशामुक्त भारत अभियानाची जनजागृती शिक्षकांनी करावी. निबंध स्पर्धा व इतर स्पर्धांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचा अंमली पदार्थांपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
युवकांना नशामुक्तीसाठी प्रोत्साहित करा. या अभियानासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. कोअर कमिटी गठित करुन त्यात मेडिकल कॉलेज, इंदिरा गांधी रुग्णालय, तज्ञ डॉक्टर्स, अन्न व औषधी विभाग यांचा त्यात समावेश करा. यासोबत गरज पडल्यास गडचिरोली येथील सर्च संस्थेची मदत घेण्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मिडियावर व्हिडिओद्वारे नागरिकांमध्ये नशामुक्त अभियानाची जनजागृती सोबत आकाशवाणी, दूरदर्शनवर ही जनजागृती करा. पोलीस विभागाने शहरातील चौकात व झोपडपट्टी भागात याबाबत लक्ष केंद्रीत करुन त्यावर प्रतिबंध घालावा, असेही ते म्हणाले.