विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची माहिती            

मुंबई :- वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव मिळत असल्याने अशा करदात्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जीएसटी विवरणपत्र भरण्याची प्रक्रीया सोपी असून देखील अनेक करदाते वेळेवर जीएसटी विवरणपत्र भरत नाहीत. नमुना जीएसटीआर-3 बीइ हा दर महिन्याला / तिमाहीत दाखल केल्या जाणाऱ्या विवरण पत्राद्वारे विक्रीचे आकडे, इनपुट टॅक्स क्रेडिटचे दावे आणि देय निव्वळ कर नोंदवले जातात. निव्वळ कर दायित्व रोख किंवा उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे प्रदान केले जाते. जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार, जीएसटी विवरणपत्र न भरल्यास विलंब शुल्क आणि व्याज आकारले जाते. पुढे करकसूरदारांना नमुना जीएसटीआर – 3 ए मध्ये नोटिसा बजावल्या जातात. नियमांचे पालन न झाल्यास अशा थकबाकीदारांचे एकतर्फी कर निर्धारण करण्याची तरतूद आहे. सतत सहा महिन्यांपर्यंत जीएसटी विवरणपत्र न भरल्यास अधिकाऱ्याकडून नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील होत असते.

बहुतेक कसुरदार वारंवार जीएसटी विवरणपत्र उशीरा भरतात. एकाच वेळी सर्व प्रलंबित विवरणपत्रानंतर अल्प विलंब शुल्कासह सर्व कालावधीचे विवरणपत्र एकत्र दाखल करतात. परिणामी, व्यवहारपुस्तकांमध्ये फेरफार / बनावट कागदपत्रे तयार करण्यास वाव मिळतो, जीएसटी विवरणपत्र भरण्यास पुरेसा वेळ मिळतो. यामुळे करचोरीची शक्यता वाढून सरकारचे आर्थिक नुकसान होते, असे जीएसटी विवरणपत्राच्या विश्लेषणातून विभागाच्या लक्षात आले आहे.

विभागाने अशा कसुरदारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जाणीवपूर्वक असा प्रकार करणाऱ्या कसुरदार करदात्यांचे प्रकरण आता जीएसटी लेखापरीक्षणाच्या अधीन केले जाणार आहे. हे लेखा परीक्षण व्यवसायाच्या ठिकाणी केले जाईल. जीएसटी अधिकारी थकबाकीदार करदात्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देवून तेथे छाननी आणि पडताळणी करतील. जीएसटी लेखा परीक्षणादरम्यान, सर्व हिशोब पुस्तके, कच्चा माल, तयार माल आदींची छाननी आणि पडताळणी होईल व त्यानंतर जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई सुरु केली जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंची विक्री मंत्रालयाच्या प्रांगणात

Tue Oct 18 , 2022
मुंबई :- महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आले आहे.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील अमरावती, जळगाव, सांगली, सातारा, वर्धा, रायगड, पालघर, या शिवाय इतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com