– शहर स्वच्छतेत सर्वांचे सहकार्य आवश्यक
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या पूर्व तयारी बाबत आढावा बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता. १३) मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात घेण्यात आली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या तयारी बाबत सादरीकरण करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंबंधी कार्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कामाचा यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीमध्ये उपायुक्त सर्वश्री विजय देशमुख, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री. हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, विजय थुल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, सुनील उईके, राजेंद्र राठोड, नरेश शिंगनजुडे, श्रीकांत वाईकर, अजय पाझारे, कमलेश चव्हाण, अजय गेडाम, मनोज सिंग, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, सर्व झोनल अधिकारी, केपीएमजी, ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान २.० च्या अंतर्गत केपीएमजी एजन्सीद्वारे सादरीकरण देण्यात आले. त्यांनी यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबींची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरातील दहाही झोनमध्ये ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत नियमित जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीद्वारे झोनमध्ये आवश्यक कार्यांची देखील माहिती यावेळी सादर करण्यात आली. यामध्ये स्वच्छतेसंबंधी सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराला स्वच्छ ठेवण्यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे तसेच त्याकरिता सर्व कार्यकारी अधिकारी, झोनल अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन, रस्त्याच्या कडेवरील स्वच्छता, फुटपाथवरील स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व सुव्यस्था, घरोघरील कचरा व्यवस्थापन, शाळेतील स्वच्छता, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, नदी व नाला स्वच्छता, कचऱ्यावर होणारी प्रक्रिया, होम कम्पोस्टिंग, बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन या सर्व ठळक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहर स्वच्छतेचा मुख्य उद्देश अनेकांपर्यंत पोहोचविण्याकरिता युवकांच्या व नागरिकांच्या सहकार्याने नवनवीन उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यावी. स्वच्छ सर्वेक्षणात आपले नागपूर शहर अधिक समोर गेले पाहिजे आणि उच्चांक गाठला पाहिजे याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त म्हणाले. प्रत्येक झोननुसार तेथील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी समजून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे. याविषयी प्रत्येक झोनल अधिकाऱ्याने आराखडा तयार करून कार्य करावे. शहरात ठिकठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा (C AND D WASTE) बांधकामाच्या ठिकाणी आढळून येत असून, तेथील झोनल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे कडक निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. शहरातील शौचालयात स्वच्छता असावी, आवश्यक त्या सुविधांसह ते युक्त असावे, नसल्यास त्याठिकाणी त्वरित काम करण्यात यावे असेही आयुक्त यावेळी म्हणाले.
बैठकीमध्ये नदी व नाला स्वच्छतेवर भर देण्यात आला. नाल्यातील झाडीझुडपे तसेच कचरा स्वच्छ करण्यात यावा.शहरातील वायू गुण निर्देशांक सुधारण्यावर काम करा असे आयुक्त म्हणाले. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच जीव्हीपी पॉईंट्स स्वच्छ करण्यात यावेत. झोनल अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या या संपूर्ण कार्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.