– सुगम संगीत व गजल मैफिलीला प्रेक्षकांची पसंती
नागपूर :- जी -२० अंतर्गत सध्या भारतात विविध ठिकाणी विविध विषयांवरील बैठकांचे सत्र सुरू आहे. भारताकडे या जागतिक परिषदेचे यजमानपद असून या निमित्य आकाशवाणी नागपूरमार्फत ‘स्वरधारा- २०२३’ आयोजन सायंटिफिक सभागृहात सायंकाळी करण्यात आले. या अप्रतिम सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरुन साद दिली.
स्वरधारा या विशेष सुगम संगीत कार्यक्रमास ‘चाफा बोलेना चाफा चालेना’ या डॉ भरवी काळे यांच्या सुमधूर गीताने प्रारंभ झाला. त्यासोबतच त्यांच्याच आवाजातील कविवर्य सुरेश भटाच्या ‘माझिया गीतात वेडे’ या रचनेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. डॉ. कुडलिंगे यांच्या ‘रंजीश ही सही’ ही हिंन्दी गजल व ‘मी माझ्या आसवाचे लाड केले’ या मराठी गजलेला प्रेक्षकांनी दाद दिली.
प्रसार भारतीय अंतर्गत नागपूर आकाशवाणीद्वारे आयोजित या कार्यक्रमात भावगीत- धनश्री देशपांडे, मराठी गजल- कुणाल इंगळे तर हिन्दी गजल- बिना चटर्जी यांच्या भारदस्त गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साथ संगत बांसरी- रवींद्र खंडारे, श्रीकांत पीसे- हार्मोनियम तर देवेद्र यादव यांनी तबल्याची साथ दिली.
नागपूरच्या आठ रस्ता चौक परिसरातील सायंटिफिक सभागृहात डॉ. साधना शिलेदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आकाशवाणीचे उपमहानिदेशक रमेश घरडे, नागपूर आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख रचना पोपटकर उपस्थित होते. यावेळी प्रकाश आत्राम यांनी कलाकाराचे स्वागत केले. विविध मान्यवरांच्या तसेच आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला आकाशवाणी व दूरदर्शनचे सर्व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम आकाशवाणीच्या ‘अ’ केंद्रावरुन म्हणजेच MW512.8 मिटर्स/ 585 यावर सकाळी 9.30 ते 10 या दरम्यान सुगम संगीताच्या चाहत्यांना ऐकता येईल.