नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी आज ज्येष्ठ नागरिकांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. विशेषतः धंतोली परिसरात त्यांनी पेट्रोलिंग करून ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या विशेष सुरक्षा बंदोबस्ताची पाहणी केली.धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्राला भेट देऊन तेथील बुथची पाहणी केली तसेच सुरक्षा व्यवस्थे संबंधी निरीक्षण केले.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनातीबाबत,शांतता आणि सुरक्षितता,पोलिसांनी संचार साधनांचा वापर, सीसीटीव्ही कॅमेरे , बुथ ची सुरक्षिता, संवेदनशील किंवा धोकादायक बूथवर अतिरिक्त पोलीस दल तैनात,विशेष खबरदारी , आपत्कालीन स्थितीत मदत मिळवण्यासाठी पोलिसांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करणे या सर्व मुद्द्यांवर सुरक्षेचा आढावा घेतला.
पोलीस आयुक्त हे माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल, अजनी चौक येथे भेट देत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांचा ” बाल दिवस निमित्त ” कार्यक्रम सुरू असताना पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन २० नोव्हेंबर रोजी आपल्या पालकांना मतदानाचे महत्त्व सांगण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींमध्ये लहान वयातच मतदानाबाबत जागरूकता निर्माण केली तसेच लहान मुलांना चॉकलेट्स देऊन बाल दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. शाळेतील शिक्षक यांनी अचानकपणे पोलीस आयुक्त हे त्यांच्या कार्यक्रमा
करिता उपस्थित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले व त्यांनी देखील या जनजागृती उपक्रमाला पाठिंबा दिला.