विशेष लेख – ‘आयुष्मान भव:’ मोहिमेतून होणार आरोग्य सेवांचा जागर

केंद्र शासन देशभर 17 सप्टेंबरपासून आयुष्मान भव: मोहीम राबवीत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविधस्तरावर आरोग्य विषयक सेवा देण्यात येत आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. देशभर मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी करण्यात आला. राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे मुंबईतही 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. आयुष्मान भव: शब्दाप्रमाणे सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावे, या हेतूने शासन काम असून मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा जागर करण्यात येत आहे.

आयुष्मान भव: हा आशिर्वादरूपी शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. या शब्दाच्या अर्थावरच ही मोहीम आधारित आहे. मोहिमेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबरपासून झाला आहे. राज्यातही राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा कार्यारंभ करण्यात आला. मोहिमेदरम्यान क्षयरोग मुक्त भारत अभियान जोरकसपणे राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त निक्षय मित्र बनवून क्षयरोग मुक्त भारत अभियानाला बळ देण्यात येत आहे. देशभरात मोहिमेदरम्यान घेतलेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळही विकसित केले आहे. मोहिमेची संपूर्ण माहिती डॅश बोर्ड स्वरूपात https:// ayushmanbhav. mohfw. gov. in/public/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देशातील कुठल्याही जिल्ह्यातील माहिती उपलब्ध आहे.

मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयुष्मान आपल्या दारी 3.0 :

‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आजपर्यंत संपूर्ण देशात 25 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने या उपक्रमामधून सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेण्यात येत आहे. वैयक्तिकस्तरावर आयुष्मान कार्ड संपृक्तता प्राप्त करणे, आयुष्मान कार्डची छपाई आणि वितरण अशाप्रकारे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष्मान कार्ड वितरण मोहीम सुरू झालेली आहे.

आयुष्मान सभा :

हा उपक्रम गावपातळीवर आरोग्य सेवा सुविधांची जनजागृती करण्याकरीता ग्रामपंचायत व व्हीएचएसएनसी (व्हिलेज हेल्थ, सॅनिटेशन अॅण्ड न्युट्रीशन कमिटी) यांच्यामार्फत राबविण्यात येतो. या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य आजार, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग आदीबाबत जनजागृती करणे, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर मिळणाऱ्या सेवा सुविधांचे मूल्यमापन करणे हा आहे. या सभेद्वारे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची व प्रत्यक्षात लाभ घेतेलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे, संलग्न रुग्णालयांची यादी प्रसिद्धी देणे, असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड यांची जनजागृती करण्यात येत आहे. आयुष्मान भव: मोहिमेमध्ये ‘निरोगी गावे’ आणि ‘निरोगी ग्रामपंचायती’ निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्या पंचायती आरोग्य योजना यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांना ‘आयुष्मान ग्रामपंचायत’ किंवा ‘आयुष्मान अर्बन वॉर्ड’ म्हणून सन्मान देण्यात येणार आहे, जे त्यांच्या न्याय आरोग्य सेवेच्या तरतुदीच्या समर्पणाचे प्रतीक आहे.

आयुष्मान मेळावा :

आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारला संकल्पनेनुसार उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजारांविषयी तपासणी, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणी, तिसऱ्या आठवड्यात माता व बाल आरोग्य, पोषण आहार व लसीकरण, चौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचे आरोग्य ही संकल्पना असणार आहे. या मेळाव्यादरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येणार आहे. सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सल्टेशन सेवा देण्यात येत आहेत.

सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आठवड्याला किमान एक आरोग्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तज्ज्ञ सेवांपासून वंचित रुग्णांना सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये तज्ज्ञ सेवांचा अभाव आहे, अशा तालुक्यांमध्ये रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.

अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी

या उपक्रमांतर्गत सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मुलांची 32 सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार मुलांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मोहिमेत रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्यात 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आयुष्मान भव : मोहिमेतून 31 डिसेंबरपर्यंत आरोग्यविषयक सेवांचा जागर सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गाडेघाट फार्म हाऊसवर जुगार खेळणारे व प्रवृत्त करणा-या विरुद्ध पोलीसांची कार्यवाही

Wed Sep 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीसानी गाडेघाट शिवारातील अम्मा दर्गाह चे मागे असलेल्या ” कामडे फॉर्म हाऊस” येथे आठ जुवारी ५२ तास पत्त्यावर पैश्याचा हार जीतचा जुगार खेळताना पकडुन त्यांचे ताब्यातील नऊ मोबाईल, १ तीनचाकी, ४ दुचाकी व नगदी ११९६० रू. असा एकुण ४,५०,९६० रु चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरोधात पोलीस स्टेशन कन्हान ला गुन्हा दाखल करून कारवाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!