मुंबई :- जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार २३०० कोटी रूपयांच्या करारानुसार कौशल्य विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून आगामी शंभर दिवसात 50 हजार युवांना प्रशिक्षण देणार असून मुंबईबरोबरच नागपूर,पुणे,नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्रालयात कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत विभाग करत असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मंत्री लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग व उच्च तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणा-या संस्थाबाबत सर्वसमावेशक असा एकत्रित कायदा करणार असून,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत 500 विविध अभ्यासक्रंमाचे व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.त्याचप्रमाणे 1000 शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार आयटीआयचे दर्जावाढ करण्यात येणार आहेत.राज्य नाविन्यता कौशल्य विकास सोसायटी मार्फत आयटीआयच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत १ लाख १० हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्याचबरोबर आयटीआय तसेच व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा ऑनलाईन करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.त्याचबरोबर आगामी 1०० रोजगार मेळावे आयोजित केले जातील.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात विभागाचे संकेतस्थळ, कार्यालयातील सोयी व सुविधा, सुकर जीवनमान, गुंतवणूक प्रसार, जनतेच्या तक्रारींचे निवारण, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या कृती कार्यक्रमावर भर देणार असून विभागाचा कारभार अधिक गतीमान करणार आहोत.1000 विविध सामंजस्य करार करण्यात आला आहे.कौशल्य विद्यापीठात मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने आर्टिफिशीयल इंटिलिजेसच्या 10 हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचे यावेळी सांगितले.