संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कामठी येथे दिनांक 17/10/2022रोज सोमवारला सर सय्यद अहमद खान यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण हे विचारपीठावर उपस्थित होते. तर मुख्य व्यक्ते म्हणून मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश जोगी हे उपस्थित होते. सोबतच विचारपीठावर इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. गजाला हाशमी,उर्दू विभागाचे विभागप्रमुख डॉ.अजहर अबरार, सहयोगी प्राध्यापक लेप्टनंट मोहम्मद असरार हे सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वक्ते डॉ. महेश जोगी यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या जीवनावर प्रकाश टाकून ते एक महान शिक्षणतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच अलिगड मुस्लिम विद्यापीठाची निर्मिती होऊ शकली. शिवाय त्यांनी मुस्लिम समाजामध्ये पुरोगामी विचार रुजावे यासाठी आधुनिक शिक्षणप्रणालीचा पुरस्कार केला होता असे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनय चव्हाण सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भारतीय भाषांना जर समोर जावयाचे असेल तर त्यांनी संगणक प्रणालीमध्ये ह्या सर्व भाषांचे सॉफ्टवेअर तरुण पिढीने तयार करावे असे आवाहन केले. आणि प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या भाषा शिकण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे असे मत मांडले. उर्दू विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अझहर अबरार यांनी आपल्या प्रास्ताविकातून म्हटले की आज मुली शिक्षण चांगल्या प्रकारे घेत आहे. हे पाहून सर सय्यद अहमद खान यांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी उमेमा फिरदोस यांनी अतिशय प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन सनोबर आफ्रिन यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.