– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश
नागपूर :- मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाच्या अनुषंगाने कर्मचा-यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेस अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाच्या अनुषंगाने दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. गुरुवारी झालेल्या सत्रात मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यशाळेत काही कर्मचारी अनुपस्थित राहिले अशा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.
नागपूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कार्याला सुरूवात झाली आहे. मनपाचे उपायुक्त डॉ. सुनील लहाने व सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम हे इतर कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण कार्य करीत आहेत. असे असताना नागरिकांनी देखील सर्वेक्षणात नियुक्त कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. याशिवाय मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण कार्यासाठी विविध विभागाच्या कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विहित कालावधीमध्ये सर्वेक्षण कार्य पूर्ण व्हावे यासाठी संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षण कार्यासाठी अधिग्रहीत कर्मचा-यांना तातडीने सर्वेक्षण कार्यासाठी उपलब्ध करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.