Ø पालकमंत्र्यांकडून योजनेचा आढावा
Ø ज्येष्ठांसाठी विनामुल्य तीर्थ दर्शन यात्रा
यवतमाळ :- राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेरील तीर्थ स्थळांना भेटी देऊन दर्शन घेता यावे, यासाठी शासनाने नुकतेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ कसा मिळतील, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाने ही योजना जाहीर करतांना तीर्थ स्थळांची यादी जाहीर केली आहे. त्यात देशभरातील 73 तर राज्यातील 66 स्थळांचा समावेश आहे. यात जिल्हा व परिसरातील काही स्थळे सुटलेली आहे. या स्थळांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. या योजनेसाठी शासन स्वतंत्र पोर्टल तयार करत आहे. त्यावर ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ दिल्या गेला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.
योजनेंतर्गत जेष्ठांना राज्य व देशातील तीर्थ स्थळ यात्रा मोफत करता येणार आहे. यासाठी प्रती लाभार्थी 30 हजार इतका खर्च शासन करणार आहे. त्यात प्रवास, निवास व भोजनाचा देखील समावेश आहे. शासन नियुक्त संस्थेद्वारे लाभार्थ्यांना ही यात्रा घडविण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी व्यक्ती 60 किंवा अधिक वर्ष वयाची असणे आवश्यक आहे. लाभार्थी राज्यातील रहिवासी असावा व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजाराच्या आत असावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड किंवा रेशनकार्ड, अधिवास किंवा जन्म दाखला, अधिवास उपलब्ध नसल्यास लाभार्थ्यांचे 15 वर्षापुर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील. उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, अटी व शर्तीचे पालन करणार असल्याबाबतचे हमीपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
जेष्ठ नागरिक स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्यास अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुर्णपणे विनामूल्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. सुरुवातीस समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी योजनेची माहिती दिली.