‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– सातारा जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सातारा :- राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- शुभारंभ, ई- भूमिपूजन, लोकार्पण श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

राज्य शासनाचे शिक्षण आणि आरोग्याला महत्व दिलेले आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले. राज्य शासनाने २०३५ चे व्हिजन तयार केले आहे. त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले. वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली जिल्हा रुग्णालये परत मिळण्यात अनेक वर्षे जातात, म्हणून पर्यायी यंत्रणा उभी राहावी यासाठी निर्णय घेतले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाख रुपयांची मर्यादा पाच लाख रुपयांवर नेण्याचा निर्णय व त्याचा सर्वांना लाभ, आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांची आरोग्य तपासणी, शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा देण्याचा निर्णय राबविण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षात सुमारे १५० कोटी रुपयांहून अधिकचा मुख्यमंत्री सहायता निधी लोकांना दिला, असेही ते म्हणाले.

‘स्मार्ट पीएचसी’ अंतर्गत दवाखान्यात देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा निरंतरपणे मिळत राहाव्यात. त्यासाठी देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने आवश्यक निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘शासन आपल्या दारी’ प्रमाणे ‘आरोग्य आपल्या दारी’

शासन आपल्या दारी उपक्रमाचा राज्यातील २ कोटी लोकांना लाभ मिळाला. त्याचप्रमाणे आरोग्य आपल्या दारी ही देखील आपली संकल्पना आहे, असेही ते म्हणाले. खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा भविष्यात शासकीय रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाव्या यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यभरात स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. त्याचा अधिक विस्तार करून नव्याने असे ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात २० ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

स्थानिकाला येथेच रोजगार

सातारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. येथील माणूस कामाच्या शोधात बाहेर जाऊ नये व त्याला इथेच रोजगार मिळावा, यासाठी तसेच त्यातून पर्यटनाला मोठी चालना मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. येथील शेतकरीदेखील आधुनिक पद्धतीने शेती करत असतात. यापुढील काळात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असेही श्री. शिंदे म्हणाले. महिला सक्षमीकरण, बचत गटांना अर्थसहाय्य इतकेच मर्यादित न राहता त्यांच्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग यासाठी सामूहिक संसाधन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. राज्यात ‘मॉडेल स्कूल’ तयार करून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’ आणि मॉडेल स्कूल यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद ठेवण्याचा निर्णय घेतला असून ‘स्मार्ट पीएचसी’ साठी ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या उपक्रमासाठी २४० कोटी रुपये उपलब्ध झाल्यास सर्व आरोग्य केंद्रे स्मार्ट होतील, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जावळी, महाबळेश्वर, पाटण आदी डोंगरी तालुके तसेच अन्य ग्रामीण भागातील पीएचसी स्मार्ट झाल्यास ग्रामीण लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, पर्यटन या बाबतीत जास्तीत जास्त काम करता येईल. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यास येथील मुले मुंबई, दिल्लीच्या मुलांशी स्पर्धा करतील. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि पालकमंत्री देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून ‘स्मार्ट पीएचसी’ उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमाप्रमाणे जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, साधनसामुग्री उपलब्ध होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रास्ताविकात सादरीकरण करून उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, या उपक्रमात जुन्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, तेथे नवीन तंत्रज्ञान, साधने, यंत्रणा उपलब्ध करून देणे तसेच मनुष्यबळाला त्याअनुरूप प्रशिक्षित करणे यावर भर देण्यात येणार आहे. जुन्या ४० पीएचसीचे बळकटीकरणावर सर्वाधिक भर देण्यात येणार असून ई- औषध प्रणाली, ई- ओपिडी व टोकन पद्धती आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे

कार्यक्रमात ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ, ५२ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भुमिपूजन, नविन प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या ठिकाणी देण्यात येणाऱ्या ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राना आयआय केअर फाउंडेशन यांनी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी अंतर्गत दिलेल्या १२५ संगणकाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज कर्पे, धैर्यशील कदम, पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

In Naigaon, a memorial for Kranti Jyoti Savitribai Phule will be erected on a ten-acre site - Chief Minister Eknath Shinde

Thu Jan 4 , 2024
Satara :- Kranti Jyotii Savitribai Phule and Mahatma Jotirao Phule are a blessing to the nation. They inspire us for social work. A grand memorial for Savitribai Phule will be constructed in Naigaon, Taluka Khandala, District Satara, over an area of ten acres, with an expenditure of 100 crore rupees, announced Chief Minister Eknath Shinde today. The 193rd birth anniversary […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com