– राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प
– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाप्रीत आणि जिल्हा परिषद यांच्या दरम्यान करार
मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २० ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना आता सौर ऊर्जेची जोड मिळणार आहे. त्यामुळे विजेच्या बिलामध्ये बचत होणार आहे. सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी (महाप्रीत) आणि जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या दरम्यान यासंदर्भातील करार करण्यात आला. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प आहे, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आकाराला येत आहे.
मंत्रालयात पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, महाप्रितचे संचालक दिनेश इंगळे, प्रकल्प संचालक राधाकृष्ण मूर्ती, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, सल्लागार श्रीनिवास देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी हा करार अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अनेक ठिकाणी केवळ वीज बिल थकीत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्याचे आपण पाहतो. त्यामुळे तेथील नागरिकांना पाणी उपलब्ध असूनही पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आता महाप्रित आणि जिल्हा परिषद यांच्यातील करारामुळे वीज बिलामध्ये बचत तर होणार आहे, त्याचबरोबर नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
सध्या जिल्ह्यातील २० प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्ष त्याची देखभाल आणि दुरुस्ती महाप्रीतच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.