मुंबई :- शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानिमित्त आज मुख्यमंत्री पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रितीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.