– ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मानले राज्य सरकार व मनपाचे आभार
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ज्या कर्मचा-यांचा कोरोनाकाळात कर्तव्यावर असताना कोव्हिडमुळे मृत्यू झाला त्यांच्या वारसांना नागपूर महानगरपालिकेतर्फे १० लक्ष रुपये सानुग्रह मदत जाहिर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य स्तरावर घेतलेल्या महत्वाच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले असून या निर्णयाबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी राज्य सरकार व मनपा प्रशासनाचे आभार मानले.
कर्तव्यावर असताना कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी ॲड. धर्मपाल मेश्राम नगरसेवक म्हणून सभागृहात वारंवार विषय मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या प्रयत्नाला आलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. काही मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत न मिळाल्याने मनपा प्रशासनाद्वारे वारसांना मनपा निधीतून १० लक्ष रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. मृत कर्मचा-यांच्या वारसांना शासनाकडून ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी १० लक्ष रुपये परत करावे, या अटीवर १० लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यासाठी महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे देखील महापालिकेद्वारे जाहिर करण्यात आले आहे.
हा निर्णय कर्तव्यावर असताना कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या महानगरपालिकेतील कर्मचा-यांच्या वारसांकरिता अत्यंत दिलासादायक असून यासाठी राज्यशासनाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. महानगरपालिकेद्वारे देखील वेळोवेळी विषयाचा पाठपुरावा करून विषय मार्गी लावल्याबद्दल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अभिनंदन केले.