नवी दिल्ली :- मैत्री या अंटार्क्टिक वरील भारतीय संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयन सायक्लोट्रॉन (EMIC) लहरींची ओळख पटवली आहे आणि या लहरींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे. किलर इलेक्ट्रॉन्सच्या (या इलेक्ट्रॉनचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या जवळ असतो, यामुळे पृथ्वी ग्रहाचा रेडिएशन बेल्ट बनतो) वर्षावमध्ये या लहरी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे इलेक्ट्रॉन आपल्या अंतराळातील तंत्रज्ञान/यंत्रसामुग्री साठी घातक आहेत. कमी उंचीच्या परिघात परिभ्रमण करणार्या उपग्रहांवर, रेडिएशन बेल्टमधील ऊर्जावान कणांचा होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी हा अभ्यास उपयोगी ठरू शकेल.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयन सायक्लोट्रॉन (EMIC) लहरींच्या जमिनीवरील निरीक्षणाचे अनेक पैलू जाणून घेण्यासाठी, भारतीय अंटार्क्टिक स्टेशन मैत्री येथे स्थापन करण्यात आलेल्या इंडक्शन कॉइल मॅग्नेटोमीटर द्वारे, 2011 आणि 2017 दरम्यान गोळा केलेल्या डेटाचे (विदा) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIG), या डीएसटीच्या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने विश्लेषण केले. त्यांना अंतराळातील लहरींच्या निर्मितीचे स्थान सापडले. यामधून सूचित झाले की, कमी-फ्रिक्वेंसीच्या लहरी उच्च-फ्रिक्वेंसीच्या लहरींना मॉड्यूलेट (प्रभावित) करतात.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयन सायक्लोट्रॉन लहरींचे मॉड्युलेशन आणि उपग्रह आणि त्यांच्या संपर्क यंत्रणेवर प्रभाव पाडणाऱ्या ऊर्जावान कणांशी ते कसे संवाद साधतात, याबद्दलची आपली समज सुधारण्यासाठी असा अभ्यास महत्त्वाचा आहे.