यवतमाळ :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये सभा, घोषणा तसेच ईतर बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे.
जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदर आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीशी संबंधित पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डिंग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक असल्याने सदर निर्बंध लावण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता- १९७३ च्या कलम १४४ अन्वये निर्बंध लागू केले आहे. सदर निर्बंध दिनांक 6 जून पर्यंत अंमलात राहतील.