– अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा खंड क्षमापित केल्याबद्दल आ. प्रवीण दटके यांनी मानले शासनाचे आभार
नागपुर :- वर्ष 2019 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा विषयक आणि सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळण्यास मिळण्यास अडचणी येत होत्या.
नागपुरातील सुमारे 5 हजार आणि राज्यातील 30 हजार अधिसंख्य कर्मचारी यामुळे त्रस्त होते , त्यामुळे आ. प्रवीण दटके यांनी शासनाकडे हा प्रश्न सातत्याने लावून धरला.
वर्ष 2022 मध्ये अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ देण्याबाबत निघालेल्या शासन निर्णयामध्ये 1 दिवसाचा तांत्रिक खंड देण्याचा समावेश करण्यात आला होता , त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ तसेच सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या .
परंतु काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शासनाने राज्यातील हजारो अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा विचार करत त्यांच्या सेवेतील 1 दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करणे बाबत निर्णय घेतला याबाबत आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून आभार मानले.
वर्ष 2022 पासून अफ्रोह संघटनेच्या माध्यमातून अधिसंख्य कर्मचाऱ्यांनी उपोषण, धरणे आंदोलन तसेच विविध मार्गातून हा विषय पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला. याबाबत आमदार प्रवीण दटके यांच्या मागणीनुसार वर्ष 2023 च्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बैठक घेऊन या विषयाला गती देण्यात आली.
अंतिमतः या निर्णयामुळे विशेषतः नागपूरसह विदर्भ व संपूर्ण राज्यातील अंदाजे 30 हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवाविषयक लाभ आता अधिसंख्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.