स्वच्छता, आरोग्य व किटकजन्य आजारांच्या जनजागृती संदर्भात पुढाकार
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रथमच प्रकाशित करण्यात आलेल्या आरोग्य पुस्तिकेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नुकतेच विमोचन केले. याप्रसंगी उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलाणी, राजेश ठाकरे, सुनिल दातार व योगेश नागे उपस्थित होते.
प्रशासन आणि जनतेमध्ये प्रभावी संवाद साधुन त्यांच्यात असलेले अंतर कमी करून नागरिकांपर्यंत आवश्यक सेवा पोहचविण्याकरिता नागपूर महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. सदर माहितीपुस्तीका असाच एक प्रयत्न आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनानुसार हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलाणी यांनी सदर पुस्तकाची संकल्पना करून लेखन व संपादन केले. सदर माहिती पुस्तिकेमध्ये सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक माहिती, स्वच्छता, आजारी असतांना घ्यायची काळजी, आजारांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजेचे निवारण, किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांकरिता जनजागृती तसेच महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली आहे.
‘नववर्षाचे नवचैतन्य, स्वच्छता आणि आरोग्यास देऊ प्राधान्य’ या घोषवाक्यासह नागपूर महानगरपालिकेची ही नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी नववर्षाची पुस्तकरूपी नवसंकल्पना असल्याचे हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलाणी यांनी सांगितले.