संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी शहर दिसायला चांगले मात्र वेशीला टांगले
कामठी ता प्र 22 :- कामठी शहरात लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी व इतर नागरिकासाठी एकही सार्वजनिक उद्यान नाही. राज्यातल्या प्रत्येक नगरपालिका असलेल्या शहरात नगर परिषद ची उद्याने आहेत नगर परिषद या उद्यानाची काळजी घेते मात्र नागपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात एकही सार्वजनिक उद्यान नाही ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
कधीकाळी कामठी शहरात एक पोरवाल पार्क होता मात्र तेथे स्वास्थ्य उपवन आहे .कामठी शहर तसे तालुकादर्जा असून मोठे शहर आहे या शहरात अनेक दिग्गजांनी या शहराच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला मात्र एकाही नगराध्यक्षाला येथील नागरिकाच्या हितार्थ असलेले उद्यानाची गरज भासली नाही याचे आश्चर्यच वाटते. त्यामुळे अश्या विविध सोयी सुविधांच्या अभवात कामठी शहर दिसायला चांगले मात्र वेशीला टांगले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहराचा नियोजनबद्ध विकास करत असताना शहराच्या सौंदर्यीकरण आणि उद्यानाची विशेष भूमिका असते मात्र कामठी नगर परिषदेला याचा विसर पडला.कामठी शहर अवाढव्य रीतीने आडवे उभे वाढत चालले आहे.शहरात विकासाच्या नावाखाली कोटी रुपयांचा निधी देत असल्याचा गाजावाजा नेतेमंडळी करीत आहेत. मात्र कृतीत नसल्याने नुसत्या विकासाच्या चर्चा होताना दिसतात त्यामुळे विकास गेला कुठे?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
सध्या कामठीत या ना त्या कारणाने प्रदूषण वाढले आहे या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.यामुळे सकाळची मोकळी हवा खाण्यासाठी येथील नागरिकांना उद्यानच उपलब्ध नाही.छोट्या मुलांना खेळण्या बाळगण्यासाठी किंवा वृद्धाना विरंगुळा म्हणून हक्काचे स्थान नाही. सध्या भीषण उन्हाळा तापत आहे त्यामुळे लोकांच्या जीवाची लाही लाही होत आहे.सायंकाळी विरंगुळा म्हणून येथे एकही उद्यान नाही. कामठी नगर परिषदची अनेक ठिकाणी मोकळी जागा आहे.या ठिकाणी नगर परिषद आपल्या हक्काची मालकीचे उद्यान बनवू शकते परंतु हे करणार कोण?अशीच स्थिती कामठी शहराच्या सौंदर्यीकरणाची आहे.कामठी शहरात सौंदर्यीकरण नाही यामुळे हे शहर ओंगळवाणे वाटते .शहराच्या सौंदर्यीकरणासाठी येथे भरपूर वाव आहे.येथील नागरिकसुद्धा कधीही आपल्या हक्कांसाठी जागरूक होताना दिसत नाही त्यामुळे लोकप्रतिनिधींचे फावते.शहरातल्या काही चौकात सौंदर्यीकरण करण्यात आले तर शहराच्या सुंदरतेत वाढ होईल यासाठी कुणितरी पुढाकार घेणे गरजेचे आहे नाही तर कामठी देशातील सर्वात मोठे खेडे झाल्या शिवाय राहणार नाही असे खेदाने म्हणावे लागेल..