Ø उमरखेड येथे विविध बाबींचा आढावा
Ø दिव्यांगांना लाभ मंजुरीपत्रांचे वितरण
Ø रेशीम शेतीला भेट व शेतकऱ्यांशी संवाद
यवतमाळ :- शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी केल्या.
विश्रामगृह उमरखेड येथे आयुक्तांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनील खंडागळे, उपायुक्त शामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नगरपालिका प्रशासनचे सहाय्यक आयुक्त निलेश जाधव, तहसीलदार आर.यु.सुरडकर, मुख्याधिकारी महेश जामनोर आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा आदी योजना, उपक्रमांचा देखील आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या या योजना आहेत. विभागात या योजना, उपक्रमांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सामावून घ्यावे असे, आयुक्तांनी सांगितले.
बैठकीनंतर आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयास भेट दिली. या ठिकाणी महसूल संवर्गातील कार्यरत तथा सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मंजूरी पत्रांचे वितरण केले. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचे विभाजन, मतदान केंद्राची इमारत, मतदान केंद्राचे नांव बदलणे तसेच नवीन मतदार नोंदणी, मतदार नावाची दुरुस्ती करणे ईत्यादी विषयाबाबत देखील आढावा घेतला. शे.तनवीर शे.मुबीन, अंजली रामराव निरडवार, फिजानाज शे.मुमताज या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले.
रेशीम शेतीची पाहणी
उमरखेड नजीक असलेल्या सुकळी येथे मनोहर शिवराम वानखेडे हे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून उत्तमप्रकारे रेशीम शेती करत आहे. विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी त्यांच्या रेशीम शेतीस भेट देऊन पाहणी केली. या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आहे. प्रत्येक वर्षी ते रेशीम कोषाच्या एकून चार बॅच घेतात. यातून वर्षाला साधारणपणे 2 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आर्णी येथे नुकसानीची पाहणी
विभागीय आयुक्तांनी आर्णी येथे दिग्रस मार्गानजीक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केली. गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने लगतच्या नाल्याला पुर येऊन निशाद काटपिलवार व रंजना काटपिलवार तसेच रियाज शेख हे वाहत असलेल्या शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला.