पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न

– रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत रविवारी (दि. ६) करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 

या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री रमेश पतंगे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक अनंत लक्ष्मण गुरव व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.

भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

एखाद्या संस्थेची प्रतिमा तिचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांकडून निर्माण होते असे सांगून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानके पर्यावरण-स्नेही व दिव्यांग-सुलभ करावीत तसेच नैतिक व मानवी मूल्ये जपावी, असे राज्यपालांनी सांगितले.

रेल्वे सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले असून रेल्वे प्रवास अधिक सुखकर झाला असल्याचे सांगून आपण विमानापेक्षा शक्यतोवर रेल्वे प्रवासाला पसंती देतो असे राज्यपालांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा राष्ट्रव्यापी प्रकल्प हाती घेऊन केंद्र शासनाने सामान्य माणसाच्या स्वागतासाठी एक प्रकारे लाल गालिचा अंथरला आहे असे सांगून राज्यातील स्थानकांच्या विकासासाठी केंद्राने १६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन भारतीय रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या विकासासाठी देखील चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास मंत्री यांनी देखील रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाआरोग्य शिबिराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

Mon Aug 7 , 2023
– राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे :-  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com