संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी जीवनातून नागपूरच्या पुण्यभूमीला वगळता येणे कठीण आहे तर नागपूर क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यातून कामठी क्षेत्राला वगळणे कठीण आहे.कामठी चे नाव उच्चरताच आणि बिडी मजुरांच्या चळवळीची आठवण काढताच एक निष्ठावंत ,निर्भिड व निश्चयी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे ऍड दादासाहेब कुंभारे हे होत.त्यांच्या कार्याचा अमिट असा ठसा विदर्भातील नव्हे तर महाराष्ट्रातील समाजमनावर उमटला आहे. बिडी मजुरांना मजुरांचा दर्जा देणारा 1964 चा ‘आय डी ऍक्ट’1966 चा ‘बिडी सिगार ऍक्ट ‘बिडी कामगारांना मिळणारा भविष्य निर्वाह निधी ,संसदेतील अनुसूचित जाती-जमाती फोरमची निर्मिती या ऐतिहासिक घटनामध्ये ऍड दादासाहेब कुंभारे यांचे मोलाचे योगदान आहे.या कार्यामुळेच ते बिडी कामगारांचे अग्रणी नेते ठरलेत .ऍड दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगारांची चळवळ यशस्वीपणे चालवली व आंबेडकरी चळवळीत म्हत्वाची भूमिका बजावली.
ऍड दादासाहेब कुंभारे तथा नारायण हरीचरण कुंभारे यांचा जन्म 23 मार्च 1923 ला राजकीय ,सामाजिक ,आर्थिक व धार्मिक क्षेत्रात नाकारण्यात आलेल्या एका महार कुटुंबात नागपूर जिल्ह्यातील कामठी गावात झाला.ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या वडिलांचे नाव हरीचरण कुंभारे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते.त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती त्यांची आई लक्ष्मीबाई हिचे निधन दादासाहेब लहान असतानाच झाल्याने त्यांच्या वडिलांनी आई व वडील अशी दुहेरी भूमिका सांभाळून आपल्या अपत्यांचे संगोपन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्या विचारांनी प्रेरित होणाऱ्या व बदलत असलेल्या समाजाची ,परिस्थितीची जाणीव त्यांच्या वडिलांना होती यामुळेच आपल्या मुलांनी भरपूर शिकावे असे त्यांना वाटत होते.
दादासाहेब कुंभारे यांनी अतिशय बिकट परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. दरम्यान त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतल्या नंतर हळूहळू त्यांचे लक्ष बिडी मजुराकडे जाऊ लागले. जयभीम नाऱ्याचे जनक ख्यातिप्राप्त असलेले बाबू हरदास एल एन यांच्यानंतर बिडी मजुरांचा कुणीही वाली राहला नव्हता त्यामुळे दादासाहेबांनी बिडी मजुरांच्या प्रश्नाना हात घालायला सुरुवात केली आणि शेवटी 1951 मध्ये त्यांनी वकिलाची परीक्षा पास केली.कायद्याचे शिक्षण घेत असंतांनाच दादासाहेब कुंभारे बिडी कामगारांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले होते.दादासाहेबांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली व त्यांनी कामठी ,नागपूर,भंडारा जिल्हा इथेच नव्हे तर जबलपूर, दुर्ग,रायपूर पर्यंत दौरे काढून बिडी कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य केले.बिडी कामगारांच्या चळवळीला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी मोठ्या मनाने 1932 मध्ये बाबू हरदास एल एन यांनी स्थापन केलेली बिडी मजदूर संघ या संघटनेचे पुंनज्जीवन केले आणि बिडी मजदूर संघाच्या शाखा कामठी, नागपूर, भंडारा ,गोंदिया, जबलपूर ,रायपूर इत्यादी प्रमुख ठिकाणी स्थापन केल्या व बिडी कामगारांच्या लढ्याला सनदशीर स्वरूप प्राप्त करून दिले.त्यांनी 1956 मध्ये पी के पोरवाल बिडी फेक्ट्रित सत्याग्रह केला तर रामकृष्ण रामनाथ बिडी फेक्ट्रित आमरण उपोषणाचा लढा दिला. दादासाहेबांच्या बिडी मजुरांच्या दीर्घकालीन आंदोलनाचा परिणाम म्हणजे 1964 मध्ये बिडी मजुरांना आय डी कायदा तसेच 1966 मध्ये मजूर मंत्री डी संजीवय्याच्या कार्यकाळात केंद्र शासनाने बिडी सिगार कायदा पास केला.
महाविद्यालयीन जीवनामध्येच दादासाहेबावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला होता.1949 मध्ये त्यानी शेंडूल्ड कास्ट फेडरेशनचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध ‘सिद्धार्थ’या नियातकालिकेचे संपादन केले होते.1972 मध्ये दादासाहेबांची निवड राज्यसभेवर झाली .
दादासाहेबांचे कार्य बिडी या उद्योग समूहापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी सन 1949 मध्ये जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरानी भंडारा मतदार संघाची पोटनिवडणूक राखीव जागेकरिता लढवली तेव्हा त्यांचा प्रत्यक्ष संबंध बाबासाहेबांशी आल्यानंतर या निवडणुकीत त्यांनी मोठ्या जोमाने बाबासाहेबांचा प्रचार केला. तेव्हा प्रचारादरम्यान केलेल्या कार्यामुळे बाबासाहेबांनी त्यांची प्रशंसा केली होती आणि त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शोषित,गरीब व दलितांची सेवा करावी असा आशीर्वाद ही बाबासाहेब आंबेडकरानी दादासाहेब कुंभारे यांना दिला होता.
ऍड दादासाहेब कुंभारे यांनी 1961 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी समाजाच्या चळवळीतील अमर सेनानी ‘बाबू हरदास एल एन यांच्या स्मूर्तीप्रीत्यर्थ ‘हरदास एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीची निर्मिती केली.या संस्थेच्या वतीने दादासाहेबांनी ‘हरदास प्राथमिक शाळा’ काढली. तर या प्राथमिक शाळेतूनच पुढे हरदास हायस्कुलची निर्मिती केली. दादासाहेबांनी निस्वार्थी भावनेतून नागपूर येथे जनता प्रिंटिंग प्रेस ची निर्मिती केली यामुळेच प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील साप्ताहिक ‘जयभीम ‘पत्र प्रकाशित होऊ लागले.मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न सुटावा म्हणून संघर्षरत चळवळीला दादासाहेबांनी मोठाच आधार दिला. त्यांच्या कार्याचे मूल्यांकन न्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या शब्दात -‘भारतीय मजुर चळवळीचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा बिडी मजुरांच्या क्षेत्रात दादासाहेब कुंभारे यांनी केलेल्या वेळ बहुमोल कार्याचा व सेवेचा उल्लेख केल्याखेरीज तो इतिहास पूर्णत्वाला पोहोचणार नाही ‘यावरून कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या महनीय कार्याची कल्पना येते.