दरणे यांना एमबीएच्या परीक्षेत बसू देण्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला हायकोर्टाचा आदेश !
नागपूर :-यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या ‘मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ (एम.बी.ए.) या अभ्यासक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिथयश उद्योजक रणजीत उर्फ गोटू रामदास दरणे यांच्याद्वारे संपूर्ण शुल्क भरून द्वितीय वर्ष प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली असताना सुद्धा, फी ची रक्कम गहाळ झाल्याचे कथित कारण दाखवून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परीक्षा विभागाकडून सोमवार दी.१६ जानेवारी पासून सुरू होत असलेल्या परीक्षेला बसू देण्यास आवश्यक हॉल टीकीट व परवानगी प्रदान करण्यात होत असलेल्या दिरंगाई विरुध्द रणजीत दरणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तातडीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज शनिवारी सकाळी ११ वाजता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची विशेष बैठक बसवून घेण्यात आलेल्या तातडीचे सुनावणी नंतर न्या. रोहित देव आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांचे खंडपीठाने दरणे यांना एमबीएच्या व्दितीय वर्षाच्या परीक्षेत बसू देण्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला हायकोर्टाने आदेश जारी केला असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यवतमाळ चे जिल्हाधिकारी यांना सोपवली असून आता येत्या सोमवार पासून सुरू होत असलेल्या परीक्षेत रणजीत दरणे यांना बसता येईल, अशी माहिती दरणे यांचे वकील ॲड. शौनक उपेंद्र कोठेकर यांनी दिली.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी रणजीत दरणे यांनी मागच्या वर्षी प्रवेश घेऊन प्रथम आणि द्वितीय सेमिस्टरची परीक्षा यवतमाळ येथील केंद्रातून प्राविण्यसह उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी ८ सप्टेंबर २०२२ रोजी ऑनलाइन प्रवेश आणि परीक्षा अर्ज सादर करून अभ्यासक्रमाची संपूर्ण फीस जमा केले होते त्यानंतर ते संबंधित स्टडी सेंटरला जाऊन एम.बी.ए.चा अभ्यासक्रम पार पाडत होते. आता सोमवार १६ जानेवारीपासून द्वितीय वर्षाच्या तृतीय सेमिस्टर ची अंतिम परीक्षा सुरू होत असल्याने त्यांनी हॉल तिकीट साठी जेव्हा प्रयत्न सुरू केले त्यावेळेस रणजीत दरणे यांना सांगण्यात आले की आपण भरलेली फीस विद्यापीठाच्या खात्यात जमा झालेली नाही, आपण बँकेकडून लिहून आणावे, असे सांगून टोलवाटोलवी सुरू केली. त्याप्रमाणे बँकेचा खाता उतारा दरणे यांनी विद्यापीठात सादर केला व विद्यापीठाच्या पेमेंट गेटवे पोर्टलने सुद्धा पुष्टी करून त्यात असे स्पष्ट दिसत होते की संपूर्ण फीस ८ सप्टेंबरला जमा झालेली होती. तरी सुद्धा विद्यापीठाने हॉल तिकीट देण्यास दिरंगाई केल्याने दरणे यांनी विद्यापीठाचे उप कुलगुरू प्रशांत कुमार पाटील आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल व्दारे निवेदन सादर केले. पण काल शनिवारी संध्याकाळपर्यंत कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेत जर बसण्याची परवानगी मिळाली नाही, तर आपले संपूर्ण वर्ष वाया जाईल, या आशंकेने आणि कोणताही पर्याय समोर न उरल्याने दरणे यांनी नागपूरचे वरिष्ठ विधीज्ञ बॅरिस्टर विनोद तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अड. शौनक उपेंद्र कोठेकर यांच्या वतीने एक तातडीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करून आज सकाळी उच्च न्यायालयाच्या विशेष बैठकीत या एकमेव प्रकरणाची तातडीची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्या. रोहित देव आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांचे खंडपीठाने दरणे यांची बाजू ऐकून आणि प्रकरणातील संपूर्ण कागदपत्र पाहून दरणे यांना परीक्षेत बसू देण्याचा अंतरीम आदेश विद्यापीठाला जारी केलेला असून या आदेशाने रणजीत दरणे विद्यापीठाच्या यवतमाळ येथील वादाफले कॉलेज सेंटरवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेत बसू शकतील. या संदर्भात यवतमाळ चे जिल्हाधिकारी यांना कळवून दरणे यांना परीक्षेत बसवून घेण्यास आवश्यक कारवाई करावी, हे कळविण्याचे निर्देश सहायक सरकारी वकील ऍड. के. आर.देशपांडे यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.
यामुळे रणजीत दरणे यांना शेवटी न्याय मिळाला असून एम.बी.ए.ची ही परीक्षा प्रविण्यासह उत्तीर्ण होण्याचा विश्वास दरणे यांनी व्यक्त केला आहे.
विद्यापीठाने पेमेंट गेटवे पोर्टलमधे सुधार करावा – बरि. विनोद तिवारी
या प्रकरणात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पेमेंट गेटवे पोर्टलमुळे शेकडो गरीब विद्यार्थी त्रस्त झाले असून या ऑनलाइन प्रणाली ला अधिक सुदृढ करावे आणि विद्यापीठाच्या पेमेंट पोर्टल मुळे शेकडो विद्यार्थ्यांचे जे नुकसान होत आहे, यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी विद्यापीठाचे उप कुलगुरू पी.जी.पाटील यांना सादर केलेल्या सविस्तर निवेदनात केली असून या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री प्रा. चंद्रकांत पाटील यांचेशी संपर्क साधून बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी त्यांचे लक्ष या गंभीर प्रकरणात वेधले आहे.