संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महिनाभर रोजे करून सश्रद्ध भावनेने अल्लाहची ‘ईबादत’केल्यानंतर आज 11 एप्रिल गुरुवार ला कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात मुस्लिम समाजबांधावांनी ‘ईद -उल-फ़ित्र'(रमजान ईद)उत्साही,आनंदी आणि मंगलमय वतावरणात साजरी करण्यात आली.
हिंदू मुस्लिम समाजबांधवानी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.दिवसभर घरोघरी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत सर्वांनी रमजान ईद चा आनंद लुटला.सकाळी शहरातील सर्व मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्यात आली.याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर,रामटेक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे ,माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत ,मो इर्शाद, नियाज सिंगाणिया आदींनी उपस्थित मुस्लिम समाजबांधवांचे रमजान ईद च्या शुभेच्छा देत स्वागत केले.
गेले महिनाभर रमजान चे रोजे करून मुस्लिम कुटुंबियानी अल्लाह व त्याचे प्रेषित मोहम्मद पैगंम्बर विषयी श्रद्धा प्रकट केली.महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळले सुदधा नाही.शेवटी रमजान ईदचे वेध लागले तेव्हा या पवित्र महिन्याला निरोप देताना सर्वांच्या भावना उचंबळून आल्या होत्या.काल बुधवारी चंद्रदर्शन होताच ‘ईद का चांद मुबारक’म्हणून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.ईदच्या दिवशी आज गुरुवारी सकाळी सर्व मशिदीत मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजसाठी एकत्र आले .तसेच सामूहिक नमाज पठण करीत देशात व जगभर सुख शांती नांदू दे, बेरोजगाराना रोजगार मिळू दे.आजारी व संकटात सापडलेल्याची ईडा पीडा टळू दे. खऱ्या अर्थाने सर्वांना धर्माने सांगितलेल्या मार्गावरुन चालण्याची सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.
इदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्याच्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला.या आनंदामध्ये मुस्लिम समाजबांधवा बरोबर हिंदू समाजबांधव परिवारही सहभागी झाला होता.दिवसभर मुस्लिम समाजबांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल सुरू होती.हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून आलिंगण देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.
ईद च्या पाश्वरभूमीवर गोल बाजार, फेरूमल चौक, परिसरात ईदसाठी लागणाऱ्या विविध वस्तू,साहित्य तसेच कपडे ,टोप्या,अत्तर,सुरमा,चप्पल,बूट,सौंदर्य प्रसाधने,सुका मेवा, शेवया,खजूर,आदींची बाजारपेठ भरली होती तर या वस्तूंची खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची झुंबड उडाली होती.ईदच्या पूर्वरात्रेला अक्षरशा जत्रेचे स्वरूप आले होते.रात्रभर सलून, चप्पल बूट ,शेवया,मेवा,कपडे आदी दुकाने सुरू होते. यात मोठ्या प्रमानात आर्थिक उलाढाल करण्यात आली. वाढती महागाई व दररोजच्या जीवनाची रनांगणाची लढाई क्षणभर बाजूला ठेवुन ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांना मोठी आर्थिक कसरत करावी लागली.तसेच रमजान ईद पर्व हा मोठ्या उत्साहाने यशस्वीरीत्या पार पडावा यासाठी पोलीस विभागातर्फे डीसीपी निकेतन कदम, एसीपी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे व पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.