राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानीत उत्साहात साजरी करण्यात आली. बाल शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले.            शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रवेश भागातील केंद्रीयस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा विराजमान करण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादले. नाशिक येथील वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com