जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन – विजयलक्ष्मी बिदरी 

  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

 वन्यजीव, पक्षी व वृक्षांची माहितीबाबत गाईडला प्रशिक्षण

 हॉटेल व रिसॉर्टमध्ये 50 टक्के हरितउर्जा वापर बंधनकारक

 हाऊसबोट, बोटींग आदी जलपर्यटन सुविधा निर्माण करा

नागपूर :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे तसेच येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या जलसंस्थामध्ये पर्यटकांसाठी हाऊसबोट, सोलर बोट आदी जलपर्यटनाच्या विविध सुविधा निर्माण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच विविध सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात स्थानिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमती बिदरी बोलत होत्या. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा आर., उपायुक्त चंद्रभान पराते, गोंदिया वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. पंचभाई, भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक राहूल गवई आदी याप्रसंगी उपस्थित होते.

नवेगाव-नागझिरा प्रकल्पात सफारीसाठी एकूण १३५ वाहनांची संख्या मंजूर करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ ४५ जिप्सी वाहन कार्यरत आहेत. त्यामुळे उर्वरित वाहने तातडीने पर्यटन सेवेत उपलब्ध करण्याचे व त्यात इलेक्ट्रिकल वाहनांचा प्राधाण्याने समावेश करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना अल्पदरात जंगल सफारीसाठी दोन बसेस सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटकांना जंगलाविषयी योग्य माहिती मिळून पर्यटनवाढ होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत गाईड यांना विशेष प्रशिक्षण देवून त्यांची गुणवत्ता वाढ करण्याचे तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण आयोजित करावे. व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स मध्ये 50 टक्के हरितउर्जेचा वापर करणे बंधनकारक करण्याचे तसेच येथे ध्वनीप्रदुषण व विद्युत दिव्यांची प्रखर रोषणाई आढल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या.

विदेशी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कात तसेच व्यावसायीक पर्यटन शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार करावा, प्लॅस्टिकचा वापर पुर्णत: बंद करून पिण्याचे पाणी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीत पर्यटकांना उपलब्ध करून देण्याच्या त्यांनी सांगितले.

पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच स्थानिकांना गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राधाण्याने उपलब्ध कराव्या.पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे, पर्यटन विकासाचा व प्रसिद्धीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

प्रारंभी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा आर. यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मागील वर्षात येथे ३५ हजार पर्यटकांनी भेट देली असून त्यातून ९६ लक्ष ४१ हजार शुल्क जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीला समितीचे पदाधिकारी तथा मानद वन्यजीव संरक्षक मुकूंद धुर्वे, सावन बहेकर, नदिम खान, शाहीद खान, पंकज देशमुख, अनिल किरणपुरे, शालीदार कामगते, वसंत कहाळकर, मंजुषा वाढई, श्रीराम भुस्कुटे रुपेश निंबार्ते, सुनिल धोटे, राजेंद्र जैन, राजेश कनोजिया व इतर संबंधीत अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri Feb 9 , 2024
– ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे :- क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळयाप्रसंगी केले. ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!