चैतन्यशील लोकशाहीमध्ये युवकांच्या सहभागाने विकासाला चालना – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर :- युवकांमध्ये प्रचंड उर्जा आहे, त्याचा वापर लोकशाहीची परंपरा टिकवण्यासाठी केला पाहिजे. आपली लोकशाही म्हणजे चैतन्यशील लोकशाही असून त्यामध्ये युवकांच्या सहभागामुळे विकासाला अधिक चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवकांचा सहभाग या विषयी मार्गदर्शन करताना श्रीमती शिंदे बोलत होत्या. यावेळी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

राज्य घटनेने आपल्याला बोलण्याचे, राहण्याचे, फिरण्याचे, विचार व्यक्त करण्याचे असे मुलभूत स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगून शिंदे म्हणाल्या, या स्वातंत्र्याचा आपणाला देशसेवेसाठी वापर करता आला पाहिजे. हे स्वातंत्र्य धोक्यात आले तरी ते लोकशाहीसाठी घातक आहे. नागरिकांच्या अधिकारांना कोणताही धोका पोहोचणार नाही यासाठी युवकांनी सक्रियपणे समाजकार्यात सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी काही वेगळे करण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही लोकांमध्ये जाऊन मिसळा, त्यांच्याशी संवाद साधावा, आपोआप तुमच्याकडून वेगळे काम होत राहील. त्यासाठी जाणीवपूर्वक काही करण्याची गरज पडत नाही. चैतन्यशील लोकशाहीमध्ये युवकांची हीच एक मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाल्या, शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असते. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे सर्व नागरिक म्हणजेच देशाचा आत्मा आहे. हा आत्मा समृद्ध करण्यासाठी काम करणे म्हणजे देशसेवा आहे. या देशसेवेची प्रेरणा तुम्हाला मिळावी यासाठीच राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्ग हा उपक्रम राबवण्यात येतो. या ठिकाणी मिळालेली प्रेरणा आणि ऊर्जा यांचा वापर देशाच्या सेवेसाठी कारावा. लोकशाहीमध्ये नागरिकांना विविध अधिकारांसोबत जबाबदारीही दिलेली असते. त्याचीही माहिती लोकांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा. रक्तदान शिबीर, वृक्षारोपणाचे कार्यक्रम अशा कार्यक्रमांमधून तुम्ही लोकांपर्यंत सहज पोहचू शकता. लोकशाहीमध्ये समाजासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे. या योगदानासाठी तुम्ही जिथे आहात तिथेच काम करु शकता. त्यासाठी देशसेवा करण्याचे ध्येय मनाशी बाळगले पाहिजे. युवक-युवतींनी लोकांना आर्थिक साक्षर करण्याचे काम करावे. एखाद्या ठिकाणी काही चुकीचे घडत असेल तर त्याविरोधात युवकांनी बोलले पाहिजे. अन्यायाची जाणीव करुन दिली पाहिजे. ही युवा पिढीची एक महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे. धर्मनिरपेक्षपणे काम करुन विकासाला महत्व दिले पाहिजे.

आमदार शिंदे पुढे म्हणाल्या, युवकांनी समाजात वावरताना सर्वांना समान मानून काम केले पाहिजे. दिव्यांग बांधवांविषयी ते विशेष आहेत हे जाणून काम केले पाहिजे. त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजना त्यांना समजून सांगितल्या पाहिजेत. त्यांच्यापर्यंत योजना पोहचवून त्यामाध्यमातून युवक त्यांचे मार्गदर्शक बनून काम करु शकतात. अशा प्रकारे युवकांनी एखादे माध्यम, क्षेत्र निवडून ध्येयासक्तीने काम केल्यास देशाच्या विकासाचा वेग आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

आमदार शिंदे पुढे म्हणाल्या, जगातील अनेक देशांमध्ये आज वेगवेगळ्या कारणांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना धोका पोहचत आहे. समाज माध्यमांवर व्यक्त झाल्यास ट्रोल करण्याची वाईट प्रथा सुरू झाली आहे. ही पद्धत म्हणजे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर आलेली गदाच आहे. ट्रोल करतात म्हणून युवकांनी बोलणे, व्यक्त होणे थांबवू नये. समाज माध्यमांमधूनच याविषयी आवाज उठवला पाहिजे. स्वतःही अशा प्रकारांपासून दूर राहिले पाहिजे व दुसऱ्यांना हे प्रकार करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. असे केल्याने लोकशाहीची परंपरा टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. लोकशाही मजबूत करणे ही युवकांची जबाबदारी आहे. त्यांनी ती समर्थपणे पार पडण्याची अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली.

या अभ्यासवर्गाच्या शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थींनी पूजा गुरवे हिने आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कायदे करणे, सुधारणा व रद्द करणे हे कायदेमंडळाचे महत्वाचे काम - आमदार अभिजित वंजारी

Wed Dec 13 , 2023
नागपूर :- नवीन कायदे करण्यासोबतच गरजेनुसार अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे हे कायदेमंडळाचे महत्वाचे काम असल्याचे प्रतिपादन आमदार अभिजित वंजारी यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये विधीविषयक प्रभावी चर्चेतून प्रभावी विधीविषयक सुधारणा याविषयी मार्गदर्शन करताना आमदार वंजारी बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते. देशात ज्याप्रमाणे संसदेचे कामकाज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com