नागपूर :-पालीभाषा ही प्राचीन भारताची जनबोली होती. या भाषेतून तत्कालीन समाज आपले व्यवहार करीत होता. त्यामुळेच या भाषेत तथागत बुद्धांनी आपला उपदेश दिला. म्हणूनच या भाषेला बुद्ध वचनाची भाषा म्हणून ओळखले जाते. या पाली भाषेचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे पाली भाषेचे संवर्धन करा असे आवाहन पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी केले.
ते पाली प्राकृत विभागात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. पाली भाषा आणि वर्तमान या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉ. बालचंद्र खांडेकर हे मुख्य अतिथी होते. यावेळी मंचावर माजी विभाग प्रमुख डॉ. मालती साखरे, डॉ. सुजित बोधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. नीरज बोधी यांनी भूषविले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ खांडेकर म्हणाले की या देशाचा फार मोठा इतिहास हा पाली भाषेमध्ये सामावलेला आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत या पाली भाषेचे संशोधन, अध्ययन आणि अध्यापन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. मानवी मूल्यावर आधारित आधुनिक समाज घडविण्यासाठी पाली भाषेचे अध्ययन अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच पालीचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे याकरिता सर्व समाजाने मागणी करावी आणि सरकार दरबारी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
डॉ मालती साखरे माजी विभाग प्रमुख यांनी अतिथींचा परिचय करून दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ नीरज बोधी विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले की, बोलीचा प्रवाह कधीही खंडित असत नाही. तो अखंडितपणे प्रवाहित असतो. त्यामुळेच आधुनिक जनबोली आणि भाषांमध्ये आपल्याला पालीचे मूळ स्वरूप पहावयास मिळते. आधुनिक भाषा या पालीतून निर्माण झालेल्या आहेत, असे त्यांनी प्रतिपादन केले. आधुनिक काळात पाली भाषेचे अध्ययन मोठ्या प्रमाणात लोकांनी करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी पाली प्राकृत आणि बुद्धिस्ट स्टडीज विषयांच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन डॉ. खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजित वनकर यांनी केले. डॉक्टर बालचंद्र खांडेकर यांच्या 80 व्या जन्मदिवसा निमित्ताने विभागाच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. तुळसा डोंगरे, प्रा. सरोज वाणी, डॉ. ज्वाला डोहाणे, प्रा. रेखा बडोले, प्रा. पुष्पा ढाबरे, विजय वासनिक, मोरेश्वर मंडपे, कैलाश घोडेस्वार, उत्तम शेवडे, सिद्धार्थ फोपरे, डॉ अर्चना लाले यांनी परिश्रम घेतले.