पोलिसांची पोलीस ठाण्यातच झाली दिवाळी साजरी.

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 25 :- शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच, नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना ‘ऑन ड्यूटी’च हा सण साजरा करावा लागतो, मात्र कुठलीही तक्रार न करता जनतेची सुरक्षा हाच आमचा सण असल्याची भावना ते बोलून दाखवतात. समाजातील सर्व घटकांतून दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की आप्तांकडे जाण्याची ओढा सर्वांना लागलेली असते. घरात तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा आस्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र सणाचा आनंद घेता येत नाही.त्यामुळे रात्रपाळीत ऑन ड्युटी पोलिसांना पोलिस ठाण्यातच दिवाळी साजरी करावी लागली.
दिवाळी सणामुळे बसस्थानक, रेल्वे स्टेशन,बाजारपेठा, मंदिरे आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार, हे लक्षात घेऊन अशा ठिकाणी पोलिसवर्ग लक्ष ठेवून नोकरीत व्यस्त होते. ऐन सणासुदीत घातपाती कारवाया होऊ नयेत, यासाठी पोलिसांना डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस कटाक्ष अशी नोकरी करावी लागली . त्यामुळे त्यांची दिवाळी ही पोलीस ठाण्यातच साजरी झाली . मात्र, जनतेने सुरक्षित सण साजरा केल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर आले.महिला पोलिसांची अडचण अशी की दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र, महिला पोलिसांना कामावरून रजा मिळत नसल्याने, वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावा लागला. शिवाय, दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र, सुटी मिळत नसल्याने तेही शक्य होत नाही. भाऊबीजेलाही भावाला ओवाळता येईल याची शाश्‍वती नसते, अशी भावना महिला पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली.समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे, हेच आमचे कर्तव्य आहे. तेच आमचे सण- उत्सव आहेत. कर्तव्य बजावताना त्याग हा करावाच लागतो. त्यातच आम्हाला आनंद असतो. त्यामुळे सणा-सुदीच्या काळातही कर्तव्य पार पाडतो. अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या आहेत तर नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या नेतृत्वात काल रात्रपाळीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, यासह कर्तव्यावर असलेल्या समस्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी चे कर्तव्य बजावत पोलीस ठाण्यातच दिवाळी साजरी केली तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्येच दिवाळी साजरी करून आनंदोत्सव साजरा केला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com