नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्री बाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे, ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे आज मुंबईत निधन झाले. एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फुले, आंबेडकरी विचारांचां सच्चा आणि निष्ठावंत पाईक, आधारस्तंभ निखळला व पुरोगामी चळवळ आज पोरकी झाली असल्याचे मत राज्याचे माजी मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले व आपली श्रद्धांजली वाहिली.
प्रा.हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. प्रा. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये प्रा. हरी नरके यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक प्रा.हरी नरके होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन प्रा. हरी नरके यांनी केले असल्याचे डॉ. राऊत सांगतात.
प्रा. हरी नरके यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू मांडणारं आणि ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी झाली आहे. ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाची बातमी वेदनादायी असून डॉ. राऊत यांनी प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.