उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आयोजित
‘शिवस्वराज्य दिन’ उत्साहात
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश देऊन कार्य केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आयोजित ‘शिवस्वराज्य दिन’ राज्य मध्यवर्ती ग्रंथालय नगर भवन, फोर्ट, मुंबईत झाला, त्यावेळी विकासचंद्र रस्तोगी बोलत होते.
या प्रसंगी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे, साहित्यिक अरुण म्हात्रे, प्र.ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यावेळी उपस्थित होते.
विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या सर्वांगिण हितासाठी राज्य कारभार केला. नागरिक व तरुणांनी शिवाजी महाराजांचे चरित्र व त्यांच्या राज्य कारभाराचा अभ्यास करावा व त्यांचे कार्य समजून घ्यावे. राष्ट्रीय ग्रंथसूची आणि शासनमान्य ग्रंथालय यादी ही ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात यावी. राज्य शासनाने 6 जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करावा, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज राज्यातील सर्व महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. तसेच सातारा येथे शिवस्वराज्य दिन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहून हा सोहळा साजरा होत आहे, या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि विविध गडकिल्ल्याचे फोटो विद्यार्थ्यांसाठी अमुल्य ठेवा आहे. साडेबारा हजार सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून ही ग्रंथसंपदा, वाचकांसाठी उपलब्ध आहे, असेही विकासचंद्र रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.
निवतकर म्हणाले, शिवस्वराज्य दिनाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनात मराठी भाषेचा वापर करुन राज्य व्यवहारकोष निर्माण केला. प्रशासनात मराठी भाषेचा वापर सुरु केला. परंतु अजूनही काही बाबी मराठीतच असणे आवश्यक आहे. शिवस्वराज्य दिनापर्यंतचा इतिहास आपण ऐकतो, वाचतो, पाहतो. परंतु शिवस्वराज्यभिषेकानंतरचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे. त्यावर अधिक काम केले पाहिजे आणि त्याची माहितीसुद्धा झाली पाहिजे. यासाठी साहित्यिकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी सांगितले.
साहित्यिक अरुण म्हात्रे म्हणाले, मराठी भाषा ही शिवरायांची, ज्ञानोबांची, संत तुकारामाची भाषा आहे. मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. या भाषेतून आपण शिवरायांच्या कार्याची आठवण केली पाहिजे.
शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट प्रत्येकांने अभ्यासला पाहिजे. कुटुंबातील, जनतेमधील, रयतेसोबतचे शिवाजी महाराज यांच्या कार्याचा अभ्यास केला पाहिजे. दु:खी माणसांना दिलासा देणारे शिवाजी महाराज होते,
ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे म्हणाले, समानतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. व्यक्तीला व्यक्ती म्हणून त्याचा सन्मान केला. क्षत्रियांना-शुद्रांना सामाजिक समानतेची वागणूक दिली, असे सांगून संदर्भ, ग्रंथ राज्यातील सर्व वाचनालयात उपलब्ध झाली पाहिजे. या संदर्भ ग्रंथासाठी विशेष निधी उपलब्ध करुन हे ग्रंथ राज्यात सर्व ग्रंथालयात उपलब्ध करुन द्यावेत. तसेच गड किल्ल्यांचे सुद्धा जतन आणि संवर्धन केले पाहिजे.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 2019-20 वर्षातील ग्रंथसूची व ग्रंथ निवड यादीचे प्रकाशन करण्यात आले व राज्य ग्रंथ निवड समितीच्या उपस्थित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील शिवकाळातील महत्त्वाचे गड-किल्ले यांची छायाचित्रे, प्रदर्शन व शिवाजी महाराजांवरील विविध ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अमित घरड यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. बालशाहीर मन पवार यांनी शाहीरी तर प्रताप फणसे यांनी पोवाडा सादर केला.
शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करण्यासाठी सकाळी 9 ते 10 या वेळेत हुतात्मा चौक येथून विविध संदेशांचे फलक, जयजयकार करत शिवप्रतिमा व ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी प्रास्ताविक केले. सहायक ग्रंथालय संचालक, औरंगाबाद सुनील हुसे यांनी सूत्रसंचालन तर प्रभारी ग्रंथपाल, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईचे संजय बनसोड यांनी आभार मानले.