पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 108व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे होणार उदघाटन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जितेंद्र सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन कार्यक्रमाला राहणार उपस्थित

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने समाजाला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचा आढावा घेणारे “प्राईड ऑफ इंडिया ” – “भारताची शान” प्रदर्शन या परिषदेचे प्रमुख आकर्षण

नवी दिल्ली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून या संपूर्ण उदघाटन सत्रामध्‍ये सहभागी होणार आहेत. परिषदेचा उद्घाटन सोहळा सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भूषवित आहे. आरटीएमएनयूच्या अमरावती मार्गावरील परिसरामध्‍ये हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

उद्घाटन सत्राला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि आरटीएमएनयू शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष, नितीन गडकरी , यांचा समावेश आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री, डॉ जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष आर. चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ” महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” अशी आहे. या कार्यक्रमात आयोजित चर्चासत्रे आणि प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी खुली आहेत.

108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तांत्रिक सत्रांची 14 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्याअंतर्गत विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये विविध ठिकाणी समांतर सत्रे आयोजित केली जातील.

या 14 विभागांव्यतिरिक्त, महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बाल विज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषद देखील भरवण्यात येणार आहे.

या सर्व सत्रांमध्ये नोबेल पारितोषिक विजेते; आघाडीचे भारतीय आणि परदेशी संशोधक; अवकाश, संरक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन यासह विविध क्षेत्रातील तज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होतील. तांत्रिक सत्रांमध्ये कृषी आणि वनीकरण विज्ञान, प्राणीशास्त्र, पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान, मानववंशशास्त्र आणि वर्तन विज्ञान, रसायनशास्त्र, पृथ्वी प्रणाली विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान, पर्यावरणशास्त्र, माहिती आणि संप्रेषण विज्ञान आणि तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणिती शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, नवीन जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यामधील पथदर्शक आणि उपयोजित संशोधन प्रदर्शित केले जाईल.

महाप्रर्दशन “प्राईड ऑफ इंडिया” म्हणजेच ‘शान भारताची’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समाजासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील ठळक घडामोडी आणि प्रमुख उपलब्धी प्रदर्शित केल्या जातील. यासह वैज्ञानिक जगाच्या पटलावर भारतातील शेकडो नवीन कल्पना, नवोपक्रम आणि उत्पादने एकत्र आणून प्रदर्शित केल्या जातील

प्राईड ऑफ इंडिया हे सरकार, देशभरातील कॉर्पोरेट, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास संस्था, नवोन्मेषक आणि नवउद्योजक यांची ताकद आणि उपलब्धी प्रदर्शित करते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज, भारतीय विज्ञान परिषदेची परंपरा असलेला विज्ञान ज्योत कार्यक्रम पार पडला. ‘झिरो माइलस्टोन’ येथे 400 हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जमले आणि या विद्यार्थ्यांनी खास टोप्या तसेच टी-शर्ट परिधान करून विद्यापीठ परिसराकडे रॅली काढली. या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वैज्ञानिक विचार अंगीकारण्याची प्रतिज्ञा घेतली. विज्ञानाचा अभ्यास केवळ शिक्षणातील एक विषय म्हणून न ठेवता आपण जीवनात जे काही करतो त्याचा एक भाग बनवा, असे आवाहन भारतीय विज्ञान परिषद संघटनेच्या (आयएससीए ) सरचिटणीस, डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांनी केले.

ऑलिम्पिक ज्योतीच्या धर्तीवर ‘विज्ञान ज्योत – ज्ञानाची ज्योत’ – कल्पना करण्यात आली आहे. समाजात, विशेषतः तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती जोपासण्यासाठी समर्पित अशी ही एक चळवळ आहे. ही ज्योत विद्यापीठाच्या परिसरामध्ये स्थापित करण्यात आली असून ती 108 व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या समाप्तीपर्यंत तेवत राहील.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाढदिवशी चंद्रपाल चौकसेंवर शुभेच्छांचा वर्षाव

Mon Jan 2 , 2023
– प्रख्यात रामधाम येथे भव्य समारोह संपन्न – सरपंच – सदस्यांचा सत्कार, महिलांना साड्यांचे वितरण रामटेक –पर्यटन मित्र, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इतर काही उपाधींनी प्रसिद्धीझोतात असलेले चंद्रपाल चौकसे यांचा वाढदिवस समारोह काल दि. १ जानेवारीला मनसर येथील प्रख्यात रामधाम तिर्थक्षेत्र येथे मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला. मनसर येथील रामधाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com